कोरोना... शतकांचा खेळ पुन्हा सुरू!; जिल्ह्याचे शतक, बुलडाणा तालुक्याचे अर्धशतक अन्‌ रुग्णसंख्या त्रिशतकापल्याड!! कोरोनाच्या मुसंडीने प्रशासन अलर्ट मोडवर

 
corona
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील वर्षी जानेवारी अखेरीस सुरू झालेला कोरोना वाढीचा सिलसिला नवीन वर्षाच्या जानेवारी मध्यावरच सुरू झालाय! आज, 12 जानेवारीला कोरोनाने पुन्हा अमर्याद विक्राळ स्वरूप धारण करतानाच शतकांचा धोकादायक गेम पुन्हा सुरू केलाय! यामुळे प्रभारी पद्धतीने सुरू असलेले जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे.

मागील पाच दिवसांपूर्वी आपल्या आगमनाची वर्दी, नंतर चाहूल देणाऱ्या कोरोना ऊर्फ कोविडकुमारने आज जिल्हा हादरवून सोडला! पुन्हा एकदा संपूर्ण जिल्हा कवेत घेणाऱ्या या संकटाने बुलडाणा तालुक्यात कोरोना भूकंपाची नोंद झाली. जिल्ह्याच्या शतकात (१०५ पॉझिटिव्ह) एकट्या बुलडाणा तालुक्याने ५० रुग्णांसह मोठा वाटा उचलला! यंदाही टॉपर असलेल्या बुलडाणासह नांदुरा १५, शेगाव १२ ,चिखली ८, खामगाव ९ या तालुक्यांवरील भयावह धोक्याची घंटी आजच्या आकडेवारीने वाजवली. देऊळगाव राजा व मोताळ्यात प्रत्येकी ३, मेहकर व लोणारात प्रत्येकी २, सिंदखेड राजात १ अशी अन्य तालुक्याची स्थिती आहे. मलकापूर, संग्रामपूर ,जळगाव हे निरंक असणे हाच आजचा दिलासा आहे.

चाचण्या वाढल्या, रुग्णही वाढले...
दरम्यान, कोरोनाच्या कमबॅकमुळे चाचण्यांची गती व संख्याही  वाढली! आजच्या अहवालानुसार १११५ पैकी १०५ जण पॉझिटिव्ह निघाले आहे. यामुळे सध्याच्या कालच्या २३१ कोरोना रुग्णांत मोठी भर पडून ती ३३६ इतकी झाली. ७७१ जणांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.