कोरोना, ताप, सर्दी, खोकल्याची "महाआघाडी'!; अनेकांच्या प्रकृतीत बिघाडी, हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढली..!!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सध्या कोरोनाने ताप, सर्दी, खोकल्यासोबत आघाडी केल्याची चर्चा असून, त्‍यांच्या या महाआघाडीमुळे अनेकांच्या प्रकृतीची बिघाडी होऊन हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढली आहे. वातावरणातील अचानक झालेला बदल यासाठी कारणीभूत ठरला जात असला तरी, कोरोनाविषयक गांभीर्य नसल्याने कोरोना आघाडीवर असल्याचे सध्या दिसून येत आहे.

गेल्या ४ ते ५ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज, ८ जानेवारी रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण जिल्ह्यात आढळल्याने हा आकडा येत्या काही दिवसांत शतपटींनी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेला अचानक वातावरण बदल, थंड हवा आणि त्यानंतर  आज ८ जानेवारी पासून पुन्हा ढगाळ वातावरण याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.

विलगीकरण आणी इतर नियमांचे पालन करावे लागू नये म्हणून अनेक जण कोरोनाची टेस्ट करण्यास टाळाटाळ करीत आहेत. घरातच उपचार किंवा खासगी डॉक्टरांचा सल्ला हाच उपाय अनेकांनी अवलंबला आहे. जिल्ह्यातल्या छोट्या दवाखान्यांमध्ये सर्दी खोकला आणि तापेचे रुग्ण ७० टक्क्यांनी वाढले आहेत. दवाखान्यात दिवसाला ८० ते १०० रुग्ण सर्दी ताप आणि खोकल्याचे येत असल्याचे समोर आले आहे. ही लक्षणे कोरोना सारखीच असल्याने अनेक जण भीतीपोटी चाचणी करण्याचे टाळत आहेत.

वातावरण बदलामुळे ताप, सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. कोरोना संसर्गाची सुद्धा हीच लक्षणे असल्याने ही लक्षणे सतत तीन दिवस आढळल्यास रुग्णांनी कोरोना चाचणी करावी.
- डॉ विजय निकाळे, बुलडाणा