काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांकडून रविकांत तुपकरांचे कौतुक! पत्रकारांसमोर म्हणाले, रविकांत तुपकरांनी आपलं कर्तुत्व सिद्ध केलंय....
Sep 3, 2024, 13:41 IST
शिर्डी(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अडीच लाख मते मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून जिंकून येणं किंवा चांगली मते घेता येऊ शकतात, मात्र लोकसभा निवडणुकीत प्रबळ संघटन आणि लोकांशी जिव्हाळ्याचं नातं असल्याशिवाय अडीच लाख मते घेता येणं शक्य नाही...रविकांत तुपकर यांनी ते करून दाखवलं.. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय अशा शब्दात काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे तोंडभरून कौतुक केले. विशेष म्हणजे राज्यातील हजारो पत्रकारांसमोर आपल्या भाषणातून बाळासाहेब थोरात यांनी तुपकर यांच्यावर स्तुती सुमने उधळली..निमित्त होते व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या जागतिक पातळीवरील संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे..
शिर्डी येथे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बाळासाहेब थोरात आणि रविकांत तुपकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात थोरात यांनी रविकांत तुपकर यांच्या कार्याचा गौरव केला. एक शेतकरी कार्यकर्ता, धडपडणारा कार्यकर्ता, वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी जीवाची बाजी लावणारा आणि कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्यासाठी तयार असणारा कार्यकर्ता म्हणून सबंध महाराष्ट्राला रविकांत तुपकर यांची ओळख आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले. लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अडीच लाख मते मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. लोकांमध्ये जिव्हाळा आणि फार मोठ प्रबळ संघटन असल्यामुळेच त्यांनी एवढी मते घेत स्वतःच कर्तुत्व सिद्ध केलंय असे बाळासाहेब थोरात म्हणाले.