समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी जिल्ह्यात समिती! जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची माहिती! घटनेचा तपास "या" मोठ्या अधिकाऱ्याकडे सोपवला..!

 
Fghvb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 
समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा नजीक पिंपळखुटा येथे झालेल्या बस अपघाताने समाजमन हेलावले. सोबतच प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. त्याची परिणीती पोलीस विभाग व आरटीओ विभागाने इतर विभागाच्या समन्वयाने बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी वरील अपघात रोखण्यासाठी समिती तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
२५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडून आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्ग अंतर्गत येणाऱ्या एम एस आर डी सी, महामार्ग पोलीस, मेहकर ते सिंदखेडराजा दरम्यान येणाऱ्या पाच पोलीस स्टेशनचे अधिकारी, आरटीओ विभाग, आरोग्य विभाग, सरकारी अभियोक्ता सोबतच इतर अधिकाऱ्यांची उपायोजनांच्या दृष्टीने आढावा घेण्याबाबत बैठक घेतली. यात सर्व समन्वयाने एक समिती तयार करण्यात येणार आहे. अपघात थांबवण्याच्या संदर्भात उपाययोजनांवर बैठक घेण्यात आल्यानंतर समिती बाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती कडासने यांनी दिली. समृद्धी महामार्गावर छोट्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. खास करून रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत अपघात जास्त होतात. जिल्हा समृद्धी महामार्गावर अलीकडे झालेल्या अपघातांमध्ये कारचे १२, ट्रकचे ५, मल्टी एक्सेलचे २ तर लक्झरीचे ३ अपघात झाले असल्याचेही यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. छोट्या वाहनांचे अपघात प्रमाण जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नाही म्हटलं तरी मोठ्या वाहनांमध्ये जेवण झाल्यानंतर चालकाला जडत्व येते किंवा गुंगी येते. त्यामुळे त्याची मेंदू चेतना जागृत राहण्यासाठी उपाय करण्यात येणार आहेत. यामध्ये एन्ट्री पॉइंटवरून सुरुवातीला प्रबोधन अर्थात समुपदेशन आणि सुरक्षित प्रवासासाठी सूचनाबोर्डची संख्या वाढवण्यावर जोर देण्यात येणार असल्याचेही कडासने यांनी यावेळी सांगितले. उपायोजनांमध्ये शासनाकडे रिफ्रेशमेंट सेंटर सुरू करण्यासाठी सूचना अहवाल शासनाकडे पाठवणार आहे. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी व खामगाव चे अतिरिक्त पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
 एसडीपीओ तपास अधिकारी...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघातात २५ जण अक्षरशः कोळसा झाले. या प्रकरणी चालक शेख दानिश याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. या अपघाताच्या घटनेचा सखोल तपास करण्याच्या दृष्टीने एसडीपीओ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे...
डीएनएसाठी नातेवाईकांच्या रक्त नमुने पाठवले...
या अपघातातील २५ पैकी केवळ चार जणांच्या मृतदेहाची ओळख पटली होती. दरम्यान नातेवाईकांच्या सहमतीने २४ मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार आणि एकाचा दफनविधी करण्यात आला. फॉरेन्सिक विभागाच्या चमूने मृतदेहाचे डीएनए साठी नमुने घेतलेले आहेत. सोबतच मृतांच्या नातेवाईकांचेही रक्त नमुने घेण्यात आलेले आहेत. हे सगळे नमुने अमरावतीला पाठवण्यात आलेले आहेत. याबाबतचा अहवाल यायला आठ ते दहा दिवसांचा अवधी लागेल अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्राने दिली आहे .