आ. रायमूलकरांनाच 'बनवले'!; या अधिकाऱ्याला पडणार महागात!!

 
रायमूलकर
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जानेफळ येथील बायपास संदर्भात आमदार संजय रायमूलकर यांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देणे रस्ते विकास महामंडळाच्या मेहकर येथील कार्यकारी अभियंत्याला महागात पडले आहे. आमदार रायमूलकर यांनी आज, २८ डिसेंबर रोजी मेहकर येथील रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता उदय बरडे यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला.

जानेफळ येथील बायपास खड्डेमय झाला आहे. त्यामुळे अवजड वाहने गावातून जातात. अपघात व वाहतुकीची कोंडी होते. या बायपास संदर्भात आमदार रायमूलकर यांनी रस्ते विकास महामंडळाचे मेहकर येथील कार्यकारी अभियंता उदय बरडे यांना विचारणा केली होती. तेव्हा हा बायपास हा देखभाल व दुरुस्तीसाठी रस्ते विकास महामंडळाकडे नाही, असे लेखी उत्तर उदय बरडे यांनी रायमूलकरांना दिले होते.

त्यानंतर आमदार रायमूलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी शरद म्हस्के यांना विचारणा केली होती तेव्हा जानेफळ बायपास हा राष्ट्रीय महामार्गाचा भाग असल्याने देखभाल व दुरुस्तीसाठी रस्ते विकास महामंडळाकडेच असल्याचे लेखी पत्र आमदार रायमूलकर यांना दिले होते. त्यामुळे आधी कार्यकारी अभियंता उदय बरडे यांनी चुकीचे व दिशाभूल करणारे उत्तर दिल्याचे वाटत असल्याने त्यांच्या विरोधात आमदार रायमूलकारांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. हे प्रकरण चौकशीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी मागणी आमदार रायमूलकारांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहणारे नरहरी झिरवळ यांनी ही सूचना तपासून घेण्यात येईल, असे उत्तर दिले.