नायगाव बु गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वांधे! पैसे खाण्यासाठी बसवले आर.ओ.फिल्टर; ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार बोकाळला;

गटविकास अधिकाऱ्यांकडे केली तक्रार; ग्रामस्थ म्हणाले, चौकशी करा! ग्रामसेवक म्हणे, हा राजकारणाचा भाग....
 
Bdnxnx
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील नायगाव बु ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामसेवक मनमानी कारभार करतात, गावकऱ्यांना उद्धट वागणूक देतात असेही तक्रारीत म्हटले आहे.
नायगाव बु गावात शुद्ध पाण्यासाठी ग्रामपंचायतने आर ओ चे फिल्टर बसवले. मात्र अद्यापही त्यातून गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही, ओ चे फिल्टर मशीन अक्षरशः धूळखात पडले आहे. मात्र असे असले तरी गावकऱ्यांना पाणी पाजण्याआधीच या कामाची बिले मात्र काढण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावातील विकास कामांत अनियमितता आहे, कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. कामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
  गावात नालेसफाई नाही, त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत . ग्रामसेवक अमोल मगर मनमानी कारभार करतात, गावकऱ्यांनी जाब विचारल्यास उद्धट वागणूक देतात. त्यामुळे गावातील कामांची अनियमितता, भ्रष्टाचार याची सखोल चौकशी करण्याची विनंती गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
 ग्रामसेवक म्हणे, हा राजकारणाचा भाग..
 दरम्यान यासंदर्भात बुलडाणा लाइव्ह ने ग्रामसेवक अमोल मगर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी" गावाला भरपूर पाणी आहे, त्यामुळे लोक आर ओ फिल्टर केलेले पाणी नेत नाही.गावात राजकारण आहे, त्यामुळे आपल्याविरोधात तक्रार देण्यात आली असावी" अशी प्रतिक्रिया ग्रामसेवक मगर यांनी दिली..