चिखली पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी ठाणेदार देता की पोलीस स्टेशन आमच्या ताब्यात देता? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकरांनी दिला इशारा,
म्हणाले, ४ ते ५ दिवसांत ठाणेदार द्या! नाहीतर....

गेल्या चार पाच महिन्यांत चार पाच अधिकारी बदलण्यात आले, प्रभारी अधिकारी देण्यात आले असे कपिल खेडेकर म्हणाले. गेल्या काही दिवसांत शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मुख्य बाजारपेठ व बस स्टँड परिसरात वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. शहराच्या वैभवाला व सामाजिक सलोख्याच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना चिखली शहरात घडल्या. चिडीमारीच्या घटना देखील वाढत आहेत याकडे कपिल खेडेकरांनी लक्ष वेधले. चिखली सारखे "अ" वर्ग दर्जाचे ठाणे असूनही इथे कायमस्वरूपी ठाणेदार का दिल्या जात नाही? असा सवाल कपिल खेडेकरांनी केला. चिखली शहराला चार ते पाच दिवसांत कायमस्वरूपी ठाणेदार द्या किंवा चिखली पोलीस स्टेशन सामान्य चिखलीकर जनतेच्या ताब्यात द्या असे खेडेकर म्हणाले. पुढील ५ दिवसांत चिखलीला कायमस्वरूपी ठाणेदार मिळाला नाही तर चिखलीकर नागरिकांना घेऊन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू आणि पोलीस स्टेशन ताब्यात घेऊ असा इशारा कपिल खेडकर यांनी दिला आहे.