माझ्या विजयात चिखली मतदारसंघाचा मोलाचा वाटा;ना. प्रतापराव जाधव यांचे भावोद्गार ; आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली चिखलीत महायुतीतर्फे जंगी सत्कार सोहळा संपन्न;
राज्यात महायुतीचे बहुमताचे सरकार येणार म्हणाले...
Jun 30, 2024, 09:45 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला सलग चार वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवून केंद्रीयमंत्री पदाचा सन्मान फक्त तुमच्यामुळे घडू शकला. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील व माझ्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या विजयात चिखली विधानसभा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून येथील विकासाला चालना देऊन आपण मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याची ग्वाही आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.चिखली विधानसभा मतदारसंघातील वतीने २९ जून महायुतीच्या रोजी आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, डॉ. प्रतापसिंह राजपूत यांच्यासह महायुतीमधील विविध पक्षांचे नेते, मान्यवर व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.



Advt👆
स्थानिक शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात हा सत्कार झाला. सत्कार समारंभापूर्वी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची खामगाव चौफुली येथून मिरवणूक काढण्यात आली.बसस्थानकमार्गे महाराणा प्रताप पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जयस्तंभ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रामदैवत रेणुका देवीचे दर्शन घेऊन ही मिरवणूक पुन्हा कार्यक्रमस्थळी पोहोचली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई, रयत क्रांती संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्यासह भाजपा विधानसभा निवडणूकप्रमुख सुनील वायाळ, कृष्णकुमार सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख गजाननसिंह मोरे, भाजपा चिखली तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, बुलढाणा तालुकाध्यक्ष अड. मोहन पवार, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, सुरेंद्र पांडे, अड. मंगेश व्यवहारे, मदन गायकवाड, शैलेश गोंधणे, गोविंद देव्हडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, दत्ता खरात, कैलास भालेकर, विठ्ठल जगदाळे, अर्जुन नेमाडे यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे सांगत ना.जाधव म्हणाले, ही निवडणूक अतिशय अटीतटीची होती. परंतु, सुज्ञ मतदार व महायुतीच्या प्रामाणिक कार्यकत्यांवर माझा ठाम विश्वास होता. त्यामुळे माझ्या मनात विजयाबद्दल कसलीही शंका नव्हती, असे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. मला केंद्रीय मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाल्यास जनतेशी नाळ जोडलेले व गोरगरिबांची सेवा करण्याची संधी असलेले खाते मिळावे, अशी माझी इच्छा होती. ती मला मिळालेल्या आयुष व कुटुंब कल्याण विभागाच्या मंत्रीपदामुळे पूर्ण झाली. या खात्याच्या माध्यमातून गोरगरीब, दीन, दुबळ्या लोकांची व रुग्णांची सेवा करण्याची संधी मला मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे. याशिवाय शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गाला गती देण्याचा तसेच पैनगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्पाच्या पूर्ततेचा संधीदेखील या मंत्रिपदामुळे आपल्याला मिळणार असून जिल्ह्याच्या समग्र विकासासाठी या मिळालेल्या संधीचे मी सोने करेल, असा शब्द प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली याशिवाय पाचशे वर्षांपासून स्वप्नवत असलेल्या आयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण झाले यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टी मोदी सरकारच्या काळात घडून आल्या, हीच श्रृंखला आगामी काळातदेखील सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार राज्यात निश्चितपणे निवडून येईल व त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीलादेखील अधिक चालना मिळेल. त्यामुळे या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले. सत्कार समारंभाचे प्रास्ताविक शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप यांनी केले.
महायुती कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश : आ. श्वेताताई महाले
प्रतिकूल परिस्थितीतदेखील संयमाच्या बळावर आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करत केंद्रीय मंत्रिपदाचा बहुमान मिळविला, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले. चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधील उबाठा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष राहतात, परंतु महायुतीच्या कार्यकत्यांमुळेच विरोधी उमेदवाराची येथून ५० हजार मतांची आघाडी घेण्याची वल्गना फोल ठरल्याची त्या म्हणाल्या. विरोधकांचा ५० हजारांचा दावा केवळ १२ हजारांवर थांबवून चिखली मतदारसंघाने प्रतापराव जाधव यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलल्याचे आ. महाले म्हणाल्या. चिखली मतदारसंघाचे प्रतापराव जाधव यांच्या विजयात मोठे योगदान आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतदेखील असेच जोरदार प्रयत्न करून जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावा व राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करून आपल्या जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती सर्वांनी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
चिखली मतदारसंघाच्या मांडल्या मागण्या..
जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा खामगाव जालना रेल्वेमार्गला केंद्र सरकारची मंजुरी मिळवण्यासाठी आता प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आ. श्वेताताई महाले यांनी बोलून दाखवला. याशिवाय भक्ती महामार्गाला होत असलेला शेतकऱ्यांचा विरोध सरकारपर्यंत पोहोचवून शेतकरीहिताचा निर्णय घेण्यासाठीसुद्धा ना. जाधव पुढाकार घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चिखली मतदारसंघातील आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या अनेक मागण्याही महाले यांनी ना. जाधव यांच्यापुढे मांडल्या