कमलेश पोपट यांच्या हत्‍येमुळे आज चिखली बंद!

वाढत्‍या घटनांमुळे व्यापारी संतप्त
 
File Photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथील आनंद इलेट्रॉनिक्स लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी दुकानमालक कमलेश पोपट यांची काल, १६ नोव्हेंबरला रात्री पावणे दहाच्या सुमारास निर्घृण हत्‍या केली. घटनेच्या निषेधार्थ चिखली शहरातील सर्व व्यापारी संघटनांनी आज, १७ नोव्‍हेंबरला चिखली बंदचे आवाहन केले आहे. त्‍यामुळे सकाळपासून बाजारपेठेत शुकशुकाट आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिखली शहर व तालुक्यात घरफोड्या, दुकानांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काल रात्री सशस्‍त्र चोरट्यांनी कमलेश पोपट यांच्या आनंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये घुसून पोपट यांच्यावर चाकूचे वार करून हत्‍या केली. चोर, दरोडेखोरांना पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही. त्यामुळे अशा घटना सातत्याने वाढत असल्याचा आरोप चिखली भाजपनेसुद्धा केला असून, व्यापाऱ्यांच्या चिखली शहर बंदला पाठिंबा देण्यात आला आहे.