मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्यात! इसरुळ येथे होणार देशातील पहिल्या श्री संत चोखोबारायांच्या मंदिरांचा लोकार्पण सोहळा; काल वाढली होती धाकधूक..

 
Shinde
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज,१२ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. चिखली तालुक्यातील इसरुळ येथे देशातील पहिल्या श्री संत चोखोबांच्या मंदिरांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता, मात्र काल राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल असल्याने मुख्यमंत्री येतील की नाही अशी थोडी धाकधूक निर्माण झाली होती, अपात्रतेसंदर्भातील १६ आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव होते. न्यायालयाने जर आमदारांना अपात्र ठरविले असते तर मुख्यमंत्री शिंदेंना राजीनामा द्यावा लागला असता. मात्र, न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचे स्पष्ट केल्याने सध्यातरी शिंदे - फडणवीस वाचले आहे. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजी नगरवरून हेलिकॉप्टरने १२ वाजून १० मिनिटांनी इसरूळ येथे पोहचतील. १२ वाजून २० मिनिटांनी संपन्न होणाऱ्या संत सेवा ट्रस्ट द्वारा संचालित श्री.संत चोखोबारायांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळ्याला ते हजेरी लावतील. कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री १.४० वाजता हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर व तिथून विमानाने मुंबईकडे रवाना होतील. ह.भ. प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या पुढाकारातून तयार झालेले श्री.संत चोखोबारायांचे मंदिर अतिशय भव्यदिव्य आहे,या सोहळ्याला प्रचंड गर्दी होणार असल्याने  तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल दिवसभर जिल्हा, तहसील व पोलीस प्रशासनाचे अधिकारी इसरुळ गावात तळ ठोकून होते.