बिबट्याला पकडा हो..! उदयनगर, अमडापुर परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी म्हणतात, शेतात जावं तरी कसं; आमचा जीव धोक्यात..

 
bibtya

उदयनगर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काही दिवसांपासून उदयनगर परिसरामध्ये बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. सदर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

जिल्ह्याच्या काही भागात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले झाल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये आधीच भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, ५ ऑगस्टच्या सकाळी ९ च्या सुमारास उदयनगर पासून जवळच असलेल्या डासाळा येथे एक शेतकरी शेतावर जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे शेतकरी चांगलाच घाबरला. मात्र, उपरोक्त बिबट्याने शेतकऱ्याकडे बघुन हळूहळू शेजारीच असलेल्या संतोष खुमकर यांच्या उसाच्या शेतात घुसला. बिबटची माहिती मिळताच शेतकरी सदर शेतशिवारात जमा झाले. उसाच्या शेतात बिबट घुसल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. 

  काही वेळात वनाधिकारी सदर ठिकाणी दाखल झाले. घटनास्थळ पंचनामा करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून दिवसभर सापळा लावला. मात्र, बिबट आले नाही. शेवटी रात्र झाल्यानंतर शेतकरी व वन्य अधिकारी घराकडे निघुन गेले. त्यानंतर उदयनगर ते बुलढाणा रोडवरून डासाळ्यापासूनच थोड्या अंतरावर सदर बिबट्या रस्ता ओलांडतांना दिसुन आला. तसेच अमडापुर येथील बल्लाळदेवी मंदिर परिसरातही बिबट्या दिसुन आल्याची चर्चा आहे. बिबट्याच्या धाकाने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असुन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.