रोखठोक : एसटी कर्मचाऱ्यांनो, ज्‍या प्रवाशांनी तुमची घरंदारं चालवली, त्‍यांचा तळतळाट आणखी किती दिवस घेणार?

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता दोन महिने हाेत आले आहेत. या काळात लालपरीवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचे अतोनात हाल, मोठ्या प्रमाणावर लूट झाली आहे. खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवाशांकडून दुप्पट, तिप्पट भाडे आकारत आहेत. यात सामान्य जनता भरडली जात आहे. त्‍यामुळे एसटी कर्मचाऱ्यांप्रती सुरुवातीला असलेली सहानुभूतीची लाट आता ओसरल्यात जमा असून, त्‍यांच्या प्रती सामान्यांकडून संतप्त भावना व्यक्‍त होत आहेत. आजवर ज्‍या एसटीने पर्यायाने प्रवाशांनी या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आज त्‍यांच्याच मुळावर या कर्मचाऱ्यांचा हेकेखोरपणा उठल्याची भावना व्यक्‍त होत आहे. आजवर बुलडाणा लाइव्हने एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सातत्याने प्रसिद्ध करून त्‍याची आक्रमकता सरकार दरबारी मांडली. पण आमची बांधिलकी ठराविक वर्गापेक्षा सामान्य जनतेप्रती जास्त आहे. त्‍यांचे सध्याचे होणारे हाल हे कुणालाही बघवले जाणार नाहीत असे सुरू आहेत. त्‍यामुळे आम्‍ही यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला प्रसिद्धी देणे थांबवत आहोत.

महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाकडे आहे. एसटीतून प्रवास करणारा वर्ग श्रीमंत नसतो. गरीब, सामान्य, विद्यार्थी, नोकरदारच एसटीवर अवलंबून आहे. गेल्या दोन महिन्यांत या वर्गाचे मोठे हाल झाले आहेत. संप मागे घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र त्‍यानंतरही बहुतांश कर्मचारी संपावरच आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांपैकी जी एक प्रमुख विलिनीकरण करण्याची मागणी आहे ती न्यायप्रविष्ठ असल्याने प्रलंबित आहे. न्यायप्रविष्ठ मागणीसाठी कर्मचारी आणखी किती दिवस सामान्य प्रवाशांना वेठीस धरणार आहेत, हा प्रश्न आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व शैक्षणिक संस्था बंद असताना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. आता सर्व व्यवहार सुरू झाले असतानाही केवळ ग्रामीण भागातील एसटी बंद असल्याने अनेक विद्यार्थी आपल्या गावातून शाळेपर्यंत किंवा महाविद्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ग्रामीण भागातून शहरात दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची वाहतूक व्यवस्थाही बंद झाली असल्याने शहरातील बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाला आहे. याच कालावधीमध्ये एसटी वाहतुकीला पर्याय म्हणून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्यांनी मात्र अव्वाच्या सव्वा पैसे आकारून लोकांची लूट चालवली आहे. १०० किलोमीटर अंतराच्या प्रवासाला एसटी महामंडळ जर दीडशे ते दोनशे रुपये आकारत असेल तर खासगी बस व्यावसायिक तब्बल तीनशे ते चारशे रुपये आकारत आहेत.

सहा आसनी व्यावसायिकांचा धंदा तेजीत असला तरी त्यांनीही आपले दर वाढवले आहेत. खरेतर या कालावधीमध्ये हजारो बसेस प्रासंगिक करार म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सहलीची सेवा उपलब्ध करून देतात; पण सध्या संप सुरू असल्याने हे मोठे उत्पन्‍नही महामंडळाचे बुडाले आहे. विवाहासारख्या मंगलकार्यासाठीही बस भाड्याने देण्याच्या माध्यमातून एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवत असते ते उत्पन्नही या संपामुळे बुडाले आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करूनही कर्मचाऱ्यांचे अपुरे पगार, उशिरा होणारे पगार, नादुरुस्त एसटी बसेस हे प्रश्‍न सुटतीलच याची शाश्वती नाही पण त्‍या न्यायप्रतिष्ठ मागणीसाठी एसटीची जी अवस्था कर्मचाऱ्यांकडून सध्या सुरू अाहे, ती सुधरायला कित्‍येक वर्षे जाणार आहेत.

सामान्यांकडे पहा... तुमचा लढा अन्य मार्गाने सुरू करा...
सामान्यांची अवस्था पाहून, त्‍यांची होणारी लूट पाहून एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन पुन्हा लालपरीला प्रवाशांच्या सेवेत आणणे गरजेचे आहे. आता प्रवाशी एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत आहेत, हे त्‍यांनीही लक्षात घेतले पाहिजेत. जे कर्मचारी सेवेत रूजू झाले त्‍यांना शिविगाळ करून, त्‍यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रकार सध्या घडत आहेत. हेही चुकीचे आहे. सामान्यांकडून पाहून एसटी कर्मचाऱ्यांनी त्‍यांचा लढा अन्य मार्गाने सुरू करण्याची गरज व्यक्‍त होत आहे.

खासगी वाहतूकदारांनी तर लाज सोडली...
एसटी बसेसचा संप सुरू असल्याने सामान्यांसाठी खरेतर खासगी प्रवाशी वाहतूकदारांनी पुढे येत माणुसकीची भावना जागृत ठेवायला हवी होती. पण मृताच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्यासारखे प्रकार त्‍यांच्याकडून सुरू आहेत. छोट्या छोट्या अंतरासाठी तिप्पट, चौपट भाडे आकारले जात असल्याने सामान्यांकडून संताप व्यक्‍त होत आहे. यात वाहतूक पोलीस, आरटीओकडूनही हस्तक्षेप केला जात नसल्याने खासगी प्रवाशी वाहतूकदारांची मुजोरी वाढली आहे. कुणी जास्त भाड्याबद्दल विचारणा केली तर अरेरावीचेही प्रकार घडताना दिसत आहेत. वाहन जोपर्यंत खच्‍चून भरले जात नाही तोपर्यंत जागेवरून हलवले जात नाही. यात कोरोनाविषयक नियमांचा हरताळ फासला जात आहे. उद्या कोरोनाच्या वाढीत खासगी प्रवाशी वाहतूकदारांचाही मोठा सहभाग आढळला तर नवल नाही. हे प्रशासनानेच आता पुढाकार घेऊन थांबविण्याची गरज व्यक्‍त होत आहे.