सकस अन कसदार निर्मितीवर मंत्रिमंडळाची मोहर!. सत्यशोधक चित्रपट टॅक्स फ्री हा बुलढाण्याच्या मातीचा सन्मान! वाचा मान्यवरांच्या प्रतिक्रिया
Jan 10, 2024, 18:29 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चित्रपट निर्मिती क्षेत्र पुण्या मुंबईचे,असे बोलले जाते. बुलढाणा हे तसे आडवळणाचे गाव. परंतु बुलढाण्याच्या मातीतील भूमिपुत्र सुनील शेळके यांनी या क्षेत्रामध्ये टाकलेलं पाऊल अन त्यांच्या टीमची पहिलीच निर्मिती असलेला 'सत्यशोधक' चित्रपट प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसात टॅक्स फ्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. याबद्दल बुलढाणेकरांनी आनंद व्यक्त करीत हा बुलडाण्याच्या मातीचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.
जाहिरात 👆
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची संघर्ष गाथा रुपेरी पडद्यावर आणण्याच काम सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून सुनील शेळके आणि सत्यशोधकच्या टीमने केले. सुनील शेळके चळवळीच्या मुशीतून आलेलं व्यक्तिमत्व. प्रशासनातील वरिष्ठ पदावर पोहोचले तरी विचारांची नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही.अभिता कंपनीच्या माध्यमातून सध्या ते उद्योग व्यवसायाशी निगडित आहे. 'सत्यशोधक' हा चित्रपट प्रदर्शनानंतर काही दिवसातच टॅक्स फ्री करण्यात आला आहे. राज्यातील सर्व चित्रपट गृहामध्ये तो सध्या झळकत आहे. याला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. सर्वसामान्य लोकांनी हा चित्रपट बघावा अशी मोहरच राज्य सरकारने चित्रपट टॅक्स फ्री करून उमटवली आहे.याबद्दल बुलढाण्यात आनंद व्यक्त करण्यात आला.
निर्माते सुनील शेळके म्हणतात...शासनाचे आभार
सत्यशोधक चित्रपट टॅक्स फ्री होईल, असा विचारही केला नव्हता. मंत्री छगन भुजबळ यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये उपस्थित केला. त्याला सर्व मंत्र्यांनी अनुमोदन दिले. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमोल मिटकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार.
सुरेश देवकर म्हणाले...खूप दिवसानंतर आली अशी निर्मिती
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावरील चित्रपट पाहून अक्षरशः भारावून गेलो. खूप सुंदर चित्रण करण्यात आले आहे. फुले दाम्पत्याचे कार्य इतिहासात घडले ते प्रत्यक्ष थिएटरमध्ये पाहताना इतिहास पुन्हा डोळ्यापुढे उभा राहतो. ही सुंदर कलाकृती टॅक्स फ्री झाल्याने हा चित्रपट लोकांनी आवर्जून बघावा अशी शासनाची सुद्धा इच्छा दिसत आहे.
मराठा सेवा संघाचे डॉ.मनोहर तुपकर म्हणाले.. फुले दाम्पत्याच्या कार्याला उजाळा
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांना जो काही माहीत होता तो अर्धवट होता. जेव्हा डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर निर्मिती केली तेव्हा खरा इतिहास लोकांना कळला. चित्रपट हे खूप मोठे माध्यम आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य खूप महान आहे. यावर निर्मिती करून हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत आणण्याचे मोठे काम झाले आहे. सर्व महिलांनी हा चित्रपट बघावा असा आहे. शासनाच्या निर्णयाचे खूप खूप आभार.