बायगावच्या शेतकऱ्यांना सन्मान निधीत शासनाकडून "बायपास"! चोखासागरात न्यायासाठी शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन..
Updated: Oct 17, 2023, 14:51 IST
देऊळगावराजा (ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. शेतकऱ्यांना चार महिन्यातुन एकदा २ हजार असे वर्षातून ६ हजार रुपये या योजने अंतर्गत देण्यात येतात. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात योजनेचा बट्टयाबोळ झाल्याचे वेगळेच वास्तव समोर आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संत चोखासागर जलाशयात चक्क अर्धनग्न आंदोलन करावे लागले. आज,१७ ऑक्टोबरच्या सकाळपासून बायगाव खुर्द येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
बायगाव खुर्द येथील २९५ शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हफ्ता मिळालेला नाही. प्रत्येक शेतकऱ्याचे ६००० रुपये याप्रमाणे २९५ शेतकऱ्यांचे १७ लाख ७० हजार रुपये प्रशासनाने शेतकऱ्यांना देणे आहे. याच शेतकऱ्यांना वर्षभरापूर्वीपर्यंत सन्मान निधीचा हप्ता मिळत होता मात्र एकाएकी या शेतकऱ्यांना मिळणारा सन्मान बंद करण्यात आला होता.
याआधी शेतकऱ्यांनी तहसीलदार ,उपविभागीय अधिकारी यांना वारंवार निवेदने दिली होती. देऊळगाव राजा तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी याआधी आंदोलन देखील केले होते मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज, अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला होता. ठरल्याप्रमाणे शेतकरी आज सकाळपासून संत चोखासागरात अर्धनग्न आंदोलन करीत आहेत.गेल्या ३ ते ४ तासांपासून शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी संघटनेचे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष तेजराव मुंढे, शिवाजी काकड, कोंडू पाटील दहातोंडे, गुलाबराव जाधव, जगन मांटे यांच्यासह अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, चिखली तालुका अध्यक्ष विलास पाटील मुजमले,मुरली महाराज येवले,प्रकाश घुबे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तहसीलदार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी पोहचले होते.