बुलडाणा लाइव्ह च्या वृत्ताने "सेटलमेंट" चा प्रयत्न फसला! वस्तीगृहातील मुलींना अळ्या असलेले अन्न खाऊ घालणारी गृहपाल निलंबित; आमदार श्वेताताईंनी केली होती मागणी..
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बुलडाणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चिखली जि बुलढाणा येथे दिनांक २२ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेबाबत विशेष तपासणी पथकामार्फत दिनांक २३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली होती. या शासकीय वसतिगृहाच्या ठिकाणी मुलींना देण्यात येणारे भोजनाची प्रत अत्यंत निकृष्ठ असल्याचे तसेच इतर सोई-सुविधांच्या बाबतीत गंभीर उणिवा आढळुन आल्याचे तसेच अधिनस्त कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या व बाह्यस्त्रोतातील कर्मचाऱ्यांच्या कामावर नियत्रंनाचा अभाव असल्याचे अहवालावरुन निदर्शनास आले. त्यामुळे या शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल एस. एस. जोशी, कनिष्ठ लिपीक यांनी शासकीय कर्तव्य पार पाडतांना हलगर्जीपणा व कसूर केल्याचे दिसुन आल्याचे अहवालात म्हटले आहे. या नुसार वस्तीगृहाच्या गृहपालांनी महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तवणूक नियम १९७९) नियम क्रमांक ३ (१) (एक) (दोन) (तिन) मधील नियमाचा भंग केलेला आहे. त्याअर्थी त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ४ (१) (अ) या नियमांतर्गत कनिष्ठ लिपीक या पदाचे नियुक्ती प्राधिकारी व शिस्त भंग विषयक प्राधिकारी म्हणुन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती यांनी एस. एस. जोशी, कनिष्ठ लिपीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मेहकर जि बुलडाणा यांना शासकीय सेवेतुन तात्काळ निलंबीत करण्याचा आदेश दिला आहे.
आ. श्वेताताई महाले यांची संवेदनशीलता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामधील विद्यार्थिनींच्या भोजनात अळ्या निघाल्याने सहा मुलींना विषबाधा झाल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह मध्ये प्रकाशित होताच संवेदनशील आमदार श्वेताताई महाले यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन पीडित विद्यार्थिनींची भेट घेतली. याशिवाय त्यांनी मुलींच्या पालकांशी देखील संवाद साधला. ही घटना अतिशय संतापजनक असून मागासवर्गीय समाजातील व शेतकऱ्यांच्या मुलींच्या जीवाशी खेळलेला हा खेळ कदापि सहन केला जाणार नाही असे आ. महाले यावेळी म्हणाल्या होत्या.. सदर घटनेशी संबंधित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यासाठी आपण शासनाकडे मागणी करणार असल्याचे व या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे आ. महाले यांनी सांगितले होते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी वरिष्ठ पातळीवर या संदर्भात पाठपुरावा केला आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणून संबंधित वस्तीगृहाच्या गृहपालाचे तातडीने निलंबन करण्याचे आदेश राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाने काढले आहेत.
प्रकरण दाबण्याचा झाला होता प्रयत्न..
वस्तीगृहातील मुलींना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर वस्तीगृह प्रशासनाने मुलींना शहरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती केले होते. शासकीय रुग्णालयात मुलींना भरती केले तर प्रकरण उजेडात येण्याची भीती वस्तीगृह प्रशासनाला होती. खाजगी हॉस्पिटल मध्ये देखील मुलींशी कुणाला बोलता येऊच नये याची व्यवस्था केली होती. मात्र बुलडाणा लाइव्ह ने आपल्या स्टाईल ने प्रकरण उजेडात आणताच एकच खळबळ उडाली. मुलींना देण्यात येणाऱ्या अन्नाचे फोटोच बुलडाणा लाइव्ह ने आपल्या वृत्तात प्रकाशित केल्यानंतर अनेकांकडून या प्रकरणावर संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हॉस्पिटल मध्ये मुलींची भेट घेतली. काही महाभागांकडून या प्रकरणात सेटलमेंट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याआधीच बुलडाणा लाइव्हचे वृत्त सगळीकडे पोहचल्याने हा मनसुबा उधळल्या गेल्या.