बुलडाणा "एलसीबी" ने दाखवून दिलं, "कानुन के हात लांब लंबे होते हैं!" डोळ्यात मिरची पावडर टाकून ८,२१,३७२ लुटणाऱ्या ८ भामट्यांना पकडले! नांदुरा तालुक्यातील येरळी पुलावर बोलरोवाल्याला लुटले होते,

दुसरा राहेरीच्या पुलावर ठरला होता लुटमारीचा बळी; ८ पैकी १ आरोपी कवळा निघाला! वाचा काय आहे प्रकरण...

 
jkfkd

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखा..किचकट अन् क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करणारी शाखा..टीम बुलडाणा एलसीबी ने आतापर्यंत अनेक किचकट गुन्हे उघडकीस आणलेत. नुकतेच जिल्ह्यात दोन दरोड्याचे गुन्हे घडले होते. नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरळी पुलावर किराणा मालाची वसुली करून मलकापूर वरून नांदुऱ्याकडे जाणाऱ्या राजू हरी गव्हाळे यांची बोलेरो अडवून व डोळ्यात मिरची पावडर टाकून ३ लाख ७८ हजार हजार रुपये असलेली पैशांची बॅग अज्ञात भामट्यांनी लांबवली होती. १८ ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेनंतर १९ ऑक्टोबरला किनगावराजा पोलीस स्टेशन हद्दीत राहेरी पुलावर देखील अशीच घटना घडली होती. किनगाव राजा येथील विष्णू पंढरीनाथ काकड (३४) हे किराणा मालाच्या वसुलीचे काम आटोपून किनगाव राजाकडे मोटारसायकलने जात होते.त्यावेळी दोन दुचाकीवर सहा जणांनी येऊन काकड यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, त्यांना मारहाण केली आणि त्यांनी वसूल करून आणलेली ४ लाख ४३ हजार ३७२ रुपये असलेली बॅग लांबवली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावण्यात टीम "एलसीबी" ला यश आले आहे. आतापर्यंत ८ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार मालवीय आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणाची माहिती दिली.

याप्रकरणातील दोन्ही टोळ्या वेगवेगळ्या असून त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही,मात्र गुन्हा करण्याची पद्धत सारखीच आहे. येरळी पुलावर घडलेल्या घटनेतील दोन्ही आरोपी मलकापूर येथील आहेत. अंशु विजय जावळेकर (१९, रा.आठवडी बाजार, मलकापूर) असे एकाचे नाव असून दुसरा वयाने कवळा अर्थात १७ वर्षाचा अल्पवयीन आहे,त्यामुळे त्याचे नाव येथे प्रसिद्ध करता येणार नाही.या प्रकरणात आरोपींकडून पोलिसांनी ५३ हजार ४९० रुपये रोख, चोरलेल्या रकमेतून विकत घेतलेला ५१ हजार रुपयांचा  ॲपल मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली दीड लाख रुपये किंमतीची रेसर बाईक असा एकूण २ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ddjj

 किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत राहेरी पुलावर घडलेल्या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ५ आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे जी विष्णू काकड यांच्यावर पाळत ठेवून होती व प्रत्यक्ष लुटमार करणाऱ्या आरोपींना माहिती पुरवत होती. दुसरबीड येथील एक आरोपी असून तो देखील या कटात सहभागी होता, त्याच्याच मदतीने आरोपींनी लुटमारीचा कट रचला होता. बाळू भागाजी मकळे(२६. रा डॉ. आंबेडकरनगर,छत्रपती संभाजीनगर) , रामेश्वर उर्फ परश्या अंकुश हिवाळे (२८, रा. मुकुंदवाडी,छत्रपती संभाजीनगर),अजय संजय जाधव(२४, रा. सुतगिरणी गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर),आकाश प्रभाकर साळवे(२५, रा. मुकुंदवाडी, ता.छत्रपती संभाजीनगर), लक्ष्मी मधुकर बोरुडे (४३,रा. पढेगाव, ता. जि छत्रपती संभाजीनगर) व कैलास गबाप्पा जितकर(४४, रा. दुसरबीड,ता. सिंदखेडराजा)  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून २ लाख १२ हजार ९०० रुपये, ४ मोबाईल फोन व २ मोटारसायकली असा ३ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली यशस्वी कारवाई..

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी( बुलडाणा), अशोक थोरात(खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस. गवळी, देऊळगावराजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार मालवीय, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने सपोनि नंदकुमार काळे, निलेश सोळंके, पोलीस अंमलदार गजानन माळी, रामविजय राजपूत, शेख ईजाज, गणेश पाटील, संजय भुजबळ, गणेश शेळके, विक्रांत इंगळे, सुभाष वाघमारे, चालक शिवानंद मुंडे, रवि भिसे, शेख जावेद सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, राजू आडवे, अमोल तरमळे दोन्ही नेमणूक तांत्रिक विष्लेषण शाखा-बुलडाणा यांनी नांदुरा प्रकरणातील तर 
पोउपनि. श्रीकांत जिंदमवार, सचिन कानडे, पोलीस अंमलदार- दिपक लेकुरवाळे, शरद गिरी, दिनेश बकाले, गजानन दराडे, राजकुमार राजपूत, पंकज मेहेर, राजेंद्र टेकाळे, शिवानंद मुंढे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, सतीश हाताळकर, मनोज खरडे, दिपक वायाळ, अनुराधा उगले, विलास भोसले सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा राजू आडवे, अमोल तरमळे दोन्ही नेमणूक तांत्रिक विष्लेषण शाखा - बुलडाणा तसेच पो.स्टे. किनगांव राजाचे प्रभारी अधिकारी सपोनि. दत्तात्रय वाघमारे, युवराज रबडे व पथक यांनी राहेरी पुलावरील लुटमार प्रकरणातील कारवाई यशस्वीपणे पार पाडली.