बुलडाणेकरांनो, तुमचा थर्टिफर्स्टचा प्लॅन पाहून पोलीस दादांनीही आखलाय एक प्लॅन!

 
drunk and drive
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उद्या, ३१ डिसेंबर म्हणजेच वर्षाचा शेवटचा दिवस... थर्टिफर्स्ट निमित्ताने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी प्लॅन आखलेत. ढाब्यावर, हॉटेलवर उद्या मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अशातच दारूच्या नशेत सुसाट गाड्या पळविणाऱ्यांसाठी जिल्हा वाहतूक पोलिसांनीसुद्धा प्लॅन आखला आहे.
दारू पिऊन गाड्या चालविणाऱ्यांवर उद्या पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांनी बुलडाणा लाइव्हला याबद्दल माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना, वाहतूक पोलिसांना दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांना दंडाची रक्कम भरण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक तरुण दारू पिऊन सुसाट गाड्या चालवितात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे उद्या पोलीस रस्त्यावर उतरून दारू पिऊन गाड्या दामटणाऱ्यांना धडा शिकविणार आहेत.