संपत चाललेला जिव्हाळा अन् शेजारधर्म आता बुलडाणा अर्बन जोपासणार! मृत व्यक्तीच्या कुटुंबाच्या घरी पोहचवणार जेवण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जलदगतीने प्रगती करणाऱ्या युगात आता नातेसंबंध, शेजारधर्म तुटत चालला आहे. शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील लोक कसे आहेत, याची विचारणादेखील आता होत नाही. दुर्दैवाने एखाद्याच्या घरात कुणाचे निधन झाल्यास त्या कुटुंबीयांचे दुःख सावरण्यासाठीही शेजाऱ्यांना वा समाजातील लोकांना वेळ नाही. संपत चाललेला जिव्हाळा, एकलकोंडी कौटुंबिक पद्धती पाहता बुलढाणा अर्बन परिवार व सकल राजस्थानी समाजाने सामाजिक बांधिलकी म्हणून मृत व्यक्तीच्या घरातील लोक व पाहुण्यांची जेवणाची सोय म्हणून ५० डबे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
सध्या शहरीकरण विस्ताराने होत आहे. शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकत्र कुटुंब पद्धती असायची. आता एकत्र नव्हेतर एकल कुटुंब पद्धती रुजली आहे. एकमेकांच्या सुख, दुःखात जाण्याचेदेखील लोक विसरत चालले आहेत. शेजारीपाजारीदेखील काहीच विचारत नाहीत. पूर्वीच्या काळी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे दुर्दैवाने निधन झाले तर सर्व सोपस्कार नातेवाइक किंवा अगदी जवळचे मित्र पार पाडायचे. मात्र, अलीकडच्या काळात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. शेजारच्या व्यक्तीचे निधन झाले तर आजूबाजूचे लोक लवकर पाहायला येत नाहीत. नातेवाइक किंवा घरातील गावाकडील मंडळी आल्यानंतर त्या कुटुंबातील लोकांची जेवणाची सोय केली जाते. हे दुर्दैवी चित्र पाहता बुलढाणा अर्बन परिवार व सकल राजस्थानी समाजाने पुढाकार घेत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना जेवणाचे डबे देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यानंतर त्या सदस्यांची तसेच नातेवाइकांची जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. पिठलं, भात, पोळीचे ५० लोकांचे भोजन घरपोच देण्यात येणार आहे. भोजन पोहोचविण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत राहील. त्यासाठी बुलढाणा अर्बन सोशल सर्व्हिसेस, समृद्धी अपार्टमेंट, जेल रोड, बुलढाणा येथे शैलेश कुळकर्णी, संतोष डुकरे यांच्याशी संपर्क करून सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.