बुलडाण्यात होणार मुला, मुलींच्या क्रीडा स्पर्धा; आधी अटी वाचून घ्या...

 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षांखालील मुले व मुली यांच्या जिल्हास्तरीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुलांची स्पर्धा 19 नोव्‍हेंबर व मुलींची स्पर्धा 20 नोव्हेंबरला होईल. खो-खो स्पर्धा मुलांची 21 नोव्हेंबर आणि मुलींची 22 नोव्हेंबरला होईल. या स्पर्धा जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात होणार आहेत. बास्केटबॉल जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन फक्त 18 वर्षांखालील मुलींसाठी 22 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता  बुलडाण्यातील सहकार विद्या मंदिरात होणार आहेत.

कबड्डी व खो-खो स्पर्धेतील विजेता संघ अमरावती विभागीय खेलो इंडीया स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल. जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत निवडलेले 5 खेळाडू निवड चाचणीतून विभागाला पात्र ठरतील. स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय अथवा क्रीडा संस्थांचे संघच सहभागी होऊ शकतात. शाळा अथवा क्रीडा संस्थांनी प्रवेश अर्ज खेळाडूचे नाव व जन्म तारीखेसह खाडाखोड न करता 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. महेश खर्डेकर मो.नं.9423393619 या क्रमांकावर व्हॉट्स अॅप करावयाचे आहे. स्पर्धेच्या दिवशी त्यांना मूळ प्रवेश अर्ज संयोजन समितीकडे जमा करावे लागतील. जर एखाद्या संस्थेचा पूर्ण संघ होऊ शकत नसला तरी एखादा चांगला खेळाडू अथवा त्या संस्थेचे खेळाडू निवड चाचणीत सहभागी होऊ शकतात.

काही कारणास्तव एखादा खेळाडू जरी शाळा बाह्य विद्यार्थी असला तरी तो खेळाडू सहभागी होऊ शकतो. खेळाडूचा जन्म 01 जानेवारी 2003 नंतर झालेला असावा. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी मुळ जन्म तारखेचा दाखला हा कमीत कमी पाच वर्षे जुना असला पाहिजे, आधारकार्ड, 10 वी पास बोर्डाचे सर्टीफिकेट यापैकी किमान 2 गोष्टी आवश्यक आहेत. तसेच कबड्डी स्पर्धेमध्ये संघाचे कमीत कमी 10 खेळाडू वजनात, वयात, कागदपत्रात बसणे आवश्यक आहे. वजनगट मुले 70 कि.ग्रॅम आतील व मुली 65 कि.ग्रॅम आतील असणे आवश्यक आहे. स्पर्धेला सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे, शाळाबाह्य विद्यार्थी व खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे.