बुलडाणा नगरपरिषदेचे शुद्धीकरण अंगलट!; संतप्त चौघांचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न, बाबासाहेबांचा फोटोही हलविल्याचा आरोप, दोन पोलिसांनी जीव धोक्‍यात घालून टाळला अनर्थ!!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ४ जानेवारीला प्रशासक म्हणून मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी पदभार स्वीकारला. त्याच दिवशी नगरपरिषदेची संपूर्ण इमारत धुण्यात आली. यावरून वाद पेटला असून, मुस्लिम समाजातील नगराध्यक्षा पाच वर्षे सत्तेत होत्या म्हणून मुख्याधिकारी पांडे यांनी जातीयवादी मानसिकतेतून शुद्धीकरण केल्याचा आरोप करत आज, ६ जानेवारीला नगरपरिषद कार्यालयात चार जणांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर डिझेल ओतून घेतले. मुख्याधिकाऱ्यांच्या पुतळा जाळला. मात्र वेळीच २ पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव संकटात टाकून अनर्थ टाळला. नगराध्यक्षा असताना त्यांच्या दालनात खुर्चीमागे असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची जागा बदलण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. फोटो पूर्ववत पहिल्या जागेवर लावत नाही तोपर्यंत नगरपरिषदेतून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने बाबासाहेबांचा फोटो आधीच्या जागेवर लावण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आज, ६ जानेवारी रोजी दुपारी दीडला घडलेल्या या प्रकारामुळे नगरपरिषद प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली. पुरेसा बंदोबस्त नसल्याने चार जणांना आवरताना श्री. डुकरे व श्री. पवार हे दोन पोलीस कर्मचारीसुद्धा डिझेलने भिजले होते.

पहा व्हिडिओ ः

समीर खान नजमोद्दीन खान, अबूबकर शाह ऊर्फ अली भाई, शेख नफीस शेख हाफिज  व मोहमद सद्दाम अशी आंदोलनकर्त्यांची नावे आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर नगरपरिषदेत दंगाकाबू पथक व अतिरिक्त पोलीस दल बोलाविण्यात आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. नगरपरिषद निवडणुका वेळेवर न होऊ शकल्याने नगरपालिकेची मुदत संपल्यानंतर मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर नगरपरिषदेची संपूर्ण इमारत धुवून स्वच्छ करण्यात आली होती. नगराध्यक्षा नजमुनिस्सा मो. सज्जाद यांच्या दालनात त्यांच्या खुर्चीच्या वर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा फोटो होता. त्याची जागा बदलून तो फोटो दालनात दुसऱ्या भिंतीवर लावण्यात आल्याने हा वाद पेटला होता.

दोनच पोलीस कर्मचारी अन्‌ चार आंदोलक...
आंदोलक आत्मदहन करणार व गणेश पांडे यांचा पुतळा जाळणार, अशी माहिती मिळाल्यानंतर  पोलिसांच्या गोपनीय विभागाचे श्री. डुकरे व श्री. पवार हे दोन कर्मचारी तातडीने आंदोलक पोहोचण्यापूर्वी नगरपरिषदेत आले. मात्र चार आंदोलक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. झटापटीत दोन पोलीस कर्मचारी डिझेलने पूर्णपणे भिजले. एका आंदोलकाने पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र श्री. पवार आणि श्री. डुकरे यांनी डिझेलने भिजलेले असताना जीवाची पर्वा न करता आग विझवल्याने  मोठा अनर्थ टळला. काही वेळानंतर दंगाकाबू पथक आणि बुलडाणा शहर पोलिसांचा ताफा नगरपरिषद कार्यालयात पोहोचला.

प्रशासक गणेश पांडे म्हणतात...

बाबासाहेबांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करूनच मी पदभार स्वीकारला. फोटो दालनातच आहे. मात्र फोटोच्या जागेवर दुसरे बोर्ड असल्याने केवळ जागा बदलण्यात आली होती. आता पुन्हा फोटो आधीच्या जागेवर लावण्यात आला आहे. मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करून इथंपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे कोणतेही चुकीचे काम माझ्या हातून होणार नाही. तसेच सुंदर माझे कार्यालय हा संकल्प जिल्हाधिकऱ्यांनी या नवीन वर्षात केला आहे. त्या अभियानाचा भाग म्हणून इमारत स्वच्छ करण्यात आली, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिली.