बुलडाणा लाइव्ह म्‍हणालं होतं, नियमित तपासणी!; निघालेही तसेच!!

आता भाईजीही म्‍हणतात, अफवांवर विश्वास ठेवू नका; तुमच्या ठेवी सुरक्षितच; "आयकर'चा छापा नव्हे, नियमित तपासणी!
 
 
radheshyam chandak
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा अर्बन बँकेच्या मुख्य शाखेत चार दिवस आयकर विभागाकडून तपासणी सुरू होती. याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र त्या अफवा अखेर अफवाच ठरल्या. तो आयकर विभागाचा छापा नसून, खात्यांची नियमित तपासणी होती, अशी माहिती बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा भाईजी चांडक यांनी दिली आहे.

खातेदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे आवाहनही त्यांनी केले. विशेष म्हणजे यापूर्वीच बुलडाणा लाइव्हने बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत आयकर विभागाची नियमित तपासणी सुरू असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. ते वृत्त तंतोतंत खरे ठरले. गेल्या वर्षभरात बुलडाणा अर्बनच्या ठेवीमध्ये मोठी वाढ झाली. या खात्यांची चौकशी व तपासणी आयकर विभागाने केली. मात्र सर्व व्यवहार पारदर्शी व सुरळीत असल्याचे भाईजी म्हणाले. कोरोना आणि संकटाच्या काळातही खातेदारांचा बुलडाणा अर्बनवरील विश्वास कमी झालेला नसून तो सतत वृद्धिंगत होत आहे. त्यामुळे ठेवी वाढत आहेत. खातेदारांनी कुठलीही शंका न बाळगता हा विश्वास वृद्धिंगत करावा, असे आवाहनही भाईजींनी केले.

आयकर विभागाचे टार्गेट फक्त अशोक चव्हाण
बुलडाणा अर्बनने नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण यांच्या चार साखर कारखान्यांना कर्ज दिले होते. एक पतसंस्था एवढे कर्ज कसे देऊ शकते, असा संशय आयकर विभागाला होता. त्यामुळे आयकर विभागाने त्या प्रकरणाची चौकशी केली. कर्ज कसे दिले? मॉर्गेज काय घेतले याबद्दलची चौकशी केली. मात्र यात कुठेही अनियमितता आढळली नाही. पवार कुटूंबियांच्या काही ठेवी आहेत का, यासाठी आयकर विभागाने बुलडाणा अर्बनच्या बारामती, फलटण या शाखांची तपासणी केली. मात्र पवार कुटूंबियांचा एक रुपयाही सापडला नाही, असेही भाईजी म्हणाले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुलडाणा अर्बनचे कामकाज व कार्यपद्धतीचे कौतुक केल्याचेही भाईजींनी सांगितले.

पहा व्हिडिओ ः