बुलडाणा कोरोनाच्या मगरमिठीत!; सलग दुसऱ्या दिवशी द्विशतक!!, प्रशासन Buldana Live ला म्‍हणतेय....

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्याला आता कोरोनाने मगरमिठीत घेतल्याचे चित्र आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने द्विशतक झळकावले असून, आठवड्यापूर्वी जिल्ह्यात ६७ बाधित होते. आजघडीला हा आकडा तब्‍बल ८७१ च्या घरात गेला आहे. हलगर्जीपणाने वावरणारे नागरिकच याला जबाबदार असून, त्‍यांच्यामुळे अवघा जिल्हा पुन्हा एकदा कोरोनाच्या दाढेत अडकला आहे. सोबतच प्रशासनालाही मोठ्या संकटात टाकले आहे. आज, १५ जानेवारीला नवे २१४ रुग्ण समोर आले आहेत.

 जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. सॅनिटायझर, मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. लग्न, अंत्यसंस्कार व इतर सोहळ्यांना सुद्धा मर्यादा घालून दिल्या आहेत. मात्र तरीही लोक नियमांना गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. ७ जानेवारी रोजी जिल्ह्यात १६ पॉझिटिव्ह आढळले होते. ८ तारखेला ४२, ९ तारखेला ३४, १० तारखेला ४६, ११ तारखेला ५२ रुग्ण, १२ तारखेला १०५ रुग्ण, १३ तारखेला १८८, १४ जानेवारीला २०९ व १५ जानेवारीला सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने द्विशतक  झळकावत २१४ पर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे नवीन रुग्ण संख्येत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहराचा वाटा सर्वाधिक ८८ इतका आहे. संग्रामपुरात दिलासायक चित्र असून तिथे एकही नवा रुग्ण समोर आला नाही.

असा आहे आजचा अहवाल...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1331 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1117 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 214 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 157 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 57 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 299 तर रॅपिड टेस्टमधील 818 अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल : बुलडाणा शहर : 67, बुलडाणा तालुका :  सागवन 3, सातगाव 1, सावळी 1, देऊळघाट 2, नांद्राकोळी 1, पळसखेड नागो 4, वरूड 1, चिखली शहर : 23, चिखली तालुका : जांभोरा 1, एकलारा 2, मंगरुळ नवघरे 1, अमोना 2, मलगी 1,  दहिगाव 1, उंद्री 1, भोरसा भोरसी 1, माळेगाव 1, शेलगाव जहा 1, मानमोडी 1,  सोनेवाडी 1,  मोताळा शहर : 7, मोताळा तालुका : धामणगाव बढे 1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 2,  मलकापूर शहर : 15, मलकापूर तालुका : उमाळी 1, नांदुरा शहर : 17, नांदुरा तालुका : वडनेर 2, निमगाव 2, हिंगणा 1, वडाळी 1, पिंपळगाव खुटा 2, इसाबपूर 4,  खामगाव शहर : 6, खामगाव तालुका : वडजी 1, शिरसगाव देशमुख 1, शेगाव शहर : 20, देऊळगाव राजा शहर :1, देऊळगाव राजा तालुका : कुंभारी 1, सिनगाव जहाँगिर 1, खामगाव 1, मंडपगाव 2, सिंदखेड राजा शहर :1, सिंदखेड राजा तालुका : सावखेड तेजन 1, साखरखेर्डा 1, लोणार शहर :1, जळगाव जामोद शहर :1, जळगाव जामोद तालुका : पिंपळगाव काळे 2, परजिल्हा : जाफराबाद 1. उपचाराअंती 35 रुग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 759058 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत 87080 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 88627 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 871 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाचा लसीकरणावर जोर...
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी बुलडाणा लाइव्हला दिली. आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्याची यंत्रणा तयार आहे. पुरेसा औषधसाठा जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, देऊळगाव राजा व मेहकर येथे ऑक्सिजनचे प्रत्येकी एक असे एकूण ४ एलएमओ टँक आहेत. ते पूर्णपणे भरलेले आहेत.

९ शासकीय व ८ खासगी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहेत. त्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ही ११.३२ मेट्रिक टन इतकी आहे. मागील वर्षी दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात दिवसाला १७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन लागत होता. सध्या ०.८० मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन दिवसाला लागत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता बेडची संख्या वाढवण्याची तयारीसुद्धा सुरू करण्यात आली आहे, असे श्री. गीते म्हणाले. तिसऱ्या लाटेत ज्यांनी लस घेतली नाही अशांनाच ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शासनाने घालून दिलेले नियम हे लोकांच्या हितासाठी आहेत. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, वारंवार स्वच्छ हात धुणे या नियमांचे पालन नागरिकांनी केलेच पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी केले.