बुलडाणा शहरचे PI प्रदीप साळुंखे सेवानिवृत्त; शहर पोलीस ठाण्यात भावपूर्ण निरोप समारंभ; कर्तव्यकठोर अधिकारी झाले भावुक!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ कायद्याचा धाक निर्माण करणारे कर्तव्यकठाेर ठाणेदार प्रदीप साळुंखे आज, ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने त्‍यांना निरोप देण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ठाणेदार प्रदीप साळुंखे भावुक झाले होते.

कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. नोव्हेंबर २०१८ पासून श्री. साळुंखे हे बुलडाणा शहराचा कारभार सांभाळत होते. दरम्यानच्या काळात साळुंखे यांनी कायद्याचा धाक बुलडाणा शहरात निर्माण केला. ते कर्तव्यकठोर अधिकारी होते.

मात्र तेवढेच ते कुटूंबवत्सल सुद्धा आहेत, अशा भावना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. जिल्ह्याचे ठिकाण असताना श्री. साळुंखे यांनी उत्तर जबाबदारी पार पाडली. बऱ्याचदा इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याअगोदर ठाणेदार तिथे पोहोचत होते. त्यामुळे शहरात अतिरिक्त पोलीस बळाचा वापर करण्याची गरज खूप कमी भासली, अशा भावना अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी व्यक्त केल्या.

श्री. साळुंखे साहेब कडक असले तरी साहेबांना आता सांभाळून घ्या, असेही बनसोडे यांनी साळुंखे यांच्या पत्नीला सांगितले. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. साळुंखे भावनिक झाले होते. २२ महिने सहकार्य केल्याबद्दल त्यांनी ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता. ३३ वर्षांपासून पोलीस खात्यात सेवा देताना खूप अनुभव आले. बुलडाणा शहरात कोरोनाकाळात सर्वाधिक काम करावे लागले, असे ते म्हणाले. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काम करत असताना तीनदा हजेरी घेत होतो. मात्र त्यामागे प्रलंबित कामे कमी व्हावे हा उद्देश होता. निवृत्त होत असताना तंदुरुस्त आणि फिट आहे. कोणताही आजार नाही. कोणतेही औषध घ्यायची गरज पडली नाही. कोणतेही व्यसन न जडल्याने फिट आहे, असे यावेळी श्री. साळुंखे म्हणाले.