BREAKING धनिक मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांना गिरडा घाटात मारहाण करून लुटणारे गजाआड! पैसे वसुलीसाठी तगादा लावल्याने धडा शिकवण्याचा रचला होता कट!
कट कसा शिजला? आरोपी कसे अडकले पोलीसांच्या जाळ्यात..? वाचा...
Updated: Jun 12, 2024, 14:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : धनिक फायनान्सच्या तीन कर्मचाऱ्यांना गिरडा घाटात अडवून बेदम मारहाण करत वसूल केलेली १ लाख ५७ हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची खळबळजनक घटना ११ जूनच्या रात्री घडली होती. दरम्यान याप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली असून पोलिसांनी २४ तासांच्या आत कारवाई करत आधी ३ आणि नंतर ३ अशा एकूण ६ जणांना अटक केली आहे.भारत चव्हाण, शुभम बाळू सुरडकर (रा. टिटवी) संजय प्रभाकर कांडेलकर, मुकेश संजय पवार, किरण अरुण सपकाळ, अमोल प्रकाश जाधव (सर्व रा. गोतमारा ता. मोताळा) अशी आरोपींची नावे आहेत.
काय घडलं होत..?
धनिक मायक्रोफायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्यांना गिरडा घाटात लुटून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी १० जून रात्री दहाच्या सुमारास घटना घडली होती. घटनास्थळ गिरडा गावापासून ६ ते ७ किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. पंजाब शेषराव थिगळे, धीरज शांतम आणि सदानंद इंगळे हे धनिक मायक्रोफायनान्सचे वसुली कर्मचारी सोयगाव तालुक्यात कर्जवसुलीसाठी गेले होते. रात्री बुलडाणा येथे परतताना त्यांना उशीर झाला. तिघे दोन मोटरसायकलीने बुलडाण्याकडे येत असताना टिटवी येथून काही जणांकडून कर्ज वसूल करून ते गिरडा घाट चढून वर येत होते. त्याचवेळी घाटातील महादेव मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या ५ ते ६ जणांनी तिघांवर हल्ला चढवला. लोखंडी रॉडने तिघांना बेदम मारहाण करण्यात आली होती.
का झाला गेम..?
या प्रकरणाचा तपास फर्दापूर पोलीस करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा शुभम बाळू सुरडकर (रा. टिटवी) याने केला आहे. पोलिसांनी तातडीने टिटवी गाठून शुभमला ताब्यात घेतले. त्याच्यात अन् संजय कांडेलकर यांनी एकमेकाना कॉल केलेले दिसले. भरत चव्हाण (रा. देव्हारी) याने शुभम सुरडकर याच्या आईला गुरुबहीण मानली असून शुभमची आई मीराबाई बाळू सुरडकर (रा. टिटवी) यांना धनिक फायनान्सने कर्ज दिले आहे. १० जून २०२४ रोजी फायनान्सचे वसुली कर्मचारी पंजाब शेषराव थिगळे, सदानंद इंगळे व धीरज शांतम हे टिटवी येथे हप्ता वसुलीसाठी टिटवी गावात आले होते. मीराबाईंनी त्यांना हप्ता देण्यास नकार दिला. मीराबाई सुरडकर यांच्या वतीने भरत चव्हाण दर महिन्याला हप्ता भरत असल्याने पंजाब थिगळे याने त्यांना हप्ता भरण्यास सांगितले तेव्हा भरत चव्हाण यांनीही सध्या पैसे भरण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे फायनान्स कर्मचारी आणि कर्जदार यांच्यात बोलचाल झाली. भरत चव्हाण याने शुभम सुरडकरला सांगितले, की फायनान्सवाले पैशासाठी त्रास आहेत. आपण गिरडा घाटात त्यांना अडवून फटके देऊ. तू तुझ्या मित्रांना कॉल करून बोलावून घे, असे सांगितले. त्याचवेळी शुभमचा मित्र संजय कांडेलकर (रा. गोतमारा, ता. मोताळा जि. बुलडाणा) याचाही त्याला कॉल आला. तोही शुभमकडे पैशाचे काही जुगाड आहे का, बचतगटाचे पैसे गोळा करणारे गावात आले का, असे विचारले. फायनान्सवाल्यांच्या वसुलीचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय मग शुभमनेही घेतला.
असा रचला प्लॅन...
शुभम सुरडकरने त्याचे मित्र संजय प्रभाकर कांडेलकर, मुकेश संजय पवार, किरण अरुण सपकाळ, अमोल प्रकाश जाधव (सर्व रा. गोतमारा ता. मोताळा) यांना फोन करून गिरडा घाट येथे बोलावून घेतले. बचत गटाचे हप्ता गोळा करणारे पंजाब थिगळे (फिर्यादी) व त्याचे सहकारी हे टिटवी गावातून पैसे घेऊन निघाल्यावर त्यांची माहिती देण्याचे काम भरत चव्हाणवर सोपवले. शुभम, संजय, मुकेश, किरण, अमोल हे गिरडा घाटात महादेव मंदिराच्या वरच्या वळणावर थांबले. पंजाब, धीरज, सदानंद हे मोटारसायकलीने टिटवी गावातून निघाल्याची माहिती भरत चव्हाण याने शुभमला दिली. ते गिरडा घाटात येताच शुभम व त्याच्या मित्रांनी तिघांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्याकडील पैसे व मोबाइल काढून घेत त्या ठिकाणाहून पळून गेले. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून फर्दापूर पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली.