BREAKING श्री.अंकित बुलडाणा जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी; विशाल नरवाडेंची बदली! केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दणक्याने राज्य सरकारचा निर्णय
Mar 19, 2024, 22:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन महिन्यांपूर्वी बुलडाणा जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली झाली आहे. यापुढे ये धुळ्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांच्या जागी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी आयएएस अधिकारी श्री. अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशाल नरवाडे मूळचे बुलडाणा जिल्हयातीलच होते. साधारणतः निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांना स्वतःच्या गृह कार्यक्षेत्रात ठेवण्यात येत नाही. मात्र निवडणुका तोंडावर आल्या असताना विशाल नरवाडे यांची बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. जवळच्या लोकांशी हितसंबंध तयार होऊ नये म्हणून आयएएस अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बदल्या होत असतात. आगामी काळात लोकसभा निवडणुका असल्याने विशाल नरवाडे यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्यातील १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.