कोथळीत रक्तपात; मुरूम उत्खननाच्या वादावरून तुंबळ हाणामारी; १८ जणांविरुद्ध गुन्हा

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कथित स्तरावर जेसीबी चालविण्यासाठी द्यावा लागणारा हप्ता व तसेच अवैध मुरुमाच्या वाहतुकीवर छापा टाकण्यासाठी महसूल पथकाला बोलवल्याच्या संशयावरून दोन गटात काल २० मार्च, बुधवार रोजी सकाळी हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील कोथळी येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी १८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
कोथळी येथील आरीफ खान अहेमद खान यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे असलेल्या जेसीबीमध्ये शे. इरफान शे. प हाशम आणी अ. जमील अ. रशीद हे भागीदार आहेत. १९ मार्च रोजी सकाळी सय्यद युसूफ सय्यद मुसा आणी कुर्बान न शाह मिस्कीन शाह या दोघांनी आरीफ खान आणि साक्षीदारांना जेसीबी चालवायची असेल तर हप्ता देण्याचे म्हटले होते. अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती. २० मार्च रोजी सकाळी सय्यद युसूफ सय्यद मुसा, कुर्बान शाह मिस्कीन शाह, मिस्कीन शाह हैदर शाह, तसलीम शाह मिस्कीन शाह, आरीफ शाह मिस्कीन शाह आणी सय्यद समीर सय्यद युसूफ या सहा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून अ. जमील अ. रशीद यांना मारहाण केली. मध्यस्थीसाठी गेलेल्यांना ही त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त सहा जणां विरुध्द गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या गटातील कोथळी येथील कुर्बान शाह मिस्कीन शाह यांनीही पोलिसात तक्रार दिली.शे. इरफान शे. हाशम, आरीफ खान अहेमद खान, शे. जमील शे. रशीद यांच्याकडे जेसीबी असून ते रात्री सरकारी जमिनीतून जेसीबीने मुरुमाचा उपसा करून विक्री करतात. १९ मार्च रोजी रात्री मोताळा तहसील कार्यालयाचे पथक आल्याने नमूद आरोपींनी त्यांचे जेसीबी आणी ट्रॅक्टर घेऊन पळ काढला होता. तहसील कार्यालयाचे पथक फिर्यादी व साक्षीदार यांनी पाठविले असे वाटल्याने आरीफ खान अहमद खान, शे. जमील शे. रशीद, शे. इरफान शे. हाशम, शे. करीम शे. रशीद, शे. रशीद शे. गणी, शे. नईम शे. रशीद, नाशीर खान नसीम खान व अन्य काहींनी यांनी तक्रारदार व साथीदारांवर राग धरून २० मार्च रोजी शे. जमील शे. रशीद याने फोन करून सय्यद युसूफ यांना कोथळी येथे बोलावले व मारहाण केली. प्रकरणी १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.