BL EXCLUSIVE : अडीचशेवर शेतकऱ्यांनी निवडला गळफास!, घेतले जहाल विष!! आत्महत्यांची मालिका कायम

 
file photo

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीस वर्षांपासून सुरू असलेली शेतकरी आत्महत्यांची ही मालिका सरत्या वर्षातही कायम राहिली! कोरोनाने दीड पावणे दोन वर्षांत 676 बळी घेतले तर त्याचा केवढा उदोउदो! त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची शासन- प्रशासनात स्पर्धा लागलीय. मात्र 2021 या सालात तब्बल 259 शेतकऱ्यांनी गळफास वा जहाल विष घेऊन आत्महत्या केली. याचे राज्यकर्ते, विरोधक, सामाजिक संघटना अन्‌ शेतकरी पुत्रांचाच भरणा असलेले राजकीय पक्ष, कार्यकर्ते अन्‌ अधिकारी कर्मचारी यांना काहीच सोयरसुतक नसावे याला काय म्हणावे?

अजिंठा व सातपुडा या दोन्ही पर्वतांच्या कुशीत बागडणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याचा आवाका मोठाच! 13 तालुके, 1419 गावे, जीवनदायी ठरणाऱ्या अन्‌  कधी जीवन उद्‍ध्वस्त करणाऱ्या नद्यांची साथ, घाटाखाली अन्‌ घाटावर असे नैसर्गिक विभाजन असलेला हा जिल्हा. एकूण विस्तारापैकी भौगोलिक क्षेत्रफळ 9 लाख 56 हजार 727 हेक्टर. यातील साडेसात लाख हेक्टर क्षेत्र खरीप तर दीड लाख क्षेत्र रब्बी पिकाखालील असल्याने अन्‌ साडेपाच लाख शेतकरी म्हणून कृषिप्रधान जिल्हा ही मानाची ओळख... पण... सन 2001 पासून या हिरव्या वैभावाला नजर लागली अन्‌ जगाला पोसणाऱ्या, अन्नदाता ही बिरुदावली मिरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्मघाताची दुर्दैवी अविरत मालिका जिल्ह्यात सुरू झालीय!

यामुळे शासन दरबारी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा ही जिल्ह्याची काळ्याकुट्ट डागासारखी नवीन ओळख शासनदरबारी नोंद झाली आहे. 2001 ते 2013 या काळात 1521 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. 2014 ते 2021 दरम्यान हा आकडा 1983 इतका झाला. सरत्या वर्षात हा आकडा 260 च्या घरात पोहोचला. मात्र यंत्रणा अन्‌ राज्यकर्ते मागील 2020 (273 आत्महत्या) 2019 (282 आत्महत्या), 2018 (316 आत्महत्या), 2017 (312 आत्महत्या)  या वर्षांच्या तुलनेत कमी यातच धन्यता मानण्यात मश्गुल आहेत.

मेल्यावरही छळ...
वीज पडून वा पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसाला आता 4 लाखांची शासकीय मदत मिळते. मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जेमतेम 1 लाखांची मदत मिळते. तीही तुटक स्वरूपात. त्यासाठीचे निकष इतके विचित्र की जेमतेम 40 टक्के वारसांनाच ही मदत मिळते. 2001 ते 2013 दरम्यान 1521 पैकी केवळ 597 वारसांना ही मदत मिळाली. 924 आत्महत्या अपात्र ठरल्या. सरत्या वर्षातही यंत्रणांची ही कार्यपद्धती कायम राहिली. जानेवारी 23 आत्महत्या, फेब्रुवारी 15, मार्च 32, एप्रिल 19, मे 28, जून 25, जुलै 34 आत्महत्या, ऑगस्ट व सप्टेंबर प्रत्येकी 19, ऑक्टोबर 28, नोव्हेंबर 15 अन्‌ डिसेंबर 2 अशी सरत्या वर्षातील आत्महत्यांची आकडेवारी आहे. त्यातील केवळ 62 मदतीस पात्र ठरल्या. यातील 20 वारसांना आजअखेर मदत देण्यात आली. 70 प्रकरणे चौकशीवर हाय! त्यामुळे आता मदतीसाठी वारसांना नवीन वर्षात हेलपाटे घालणे आलेच. 127 आत्महत्या अपात्र ठरवून वारसांना मदत नाकारण्यात आली. अजरामर गझलकार , कवी सुरेश भट यांच्या, इतकेच मला जाताना कळले होते. मरणाने केली सुटका, जीवनाने छळले होते या अजरामर पंक्तीतून या दुर्दैवी शेतकऱ्यांची कथा अन्‌ व्यथा अधोरेखांकीत होते...