बुलडाण्यात मोठे कांड! कनिष्ठ लिपिकाने केल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या खोट्या सह्या..! किती लाटले? तपासातून येणार समोर...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कनिष्ठ लिपीक विशाल तेजराव वाघ याने शल्यचिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत वैद्यकीय बिलांमध्ये घोटाळा केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 याबाबत सामान्य रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉ.साईनाथ वसंतराव तोडकर यांनी शहर पोलिसांत काल रात्री उशिरा तक्रार दिली, १९ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत विशाल वाघ याने शल्यचिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत तसेच खोटे जावक क्रमांक टाकून फसवणूक केली. काही आजारांच्या बिलांमध्ये शासन निर्णयात नमूद असलेले आजारांचा समावेश नसल्याने ही बाब उघडकीस आली. खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट देयके (बिले) तयार करून रुग्णालय प्रशासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपी विशाल वाघ याला अजून अटक करण्यात आली नाही. खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट बिलामंधून किती रुपयांचा घोटाळा झाला हे तपासातून समोर येईल, सध्या तपास सुरू आहे या प्रकरणात आणखी किती घोटाळेबाज उघडकीस येतील हे देखील पहावे लागणार असे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सांगितले.