मोठी बातमी! सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत आज बुलडाणा जिल्ह्यात! कारण आहे "विशेष"; पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त...
Nov 19, 2023, 09:19 IST
शेगाव( ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत आज,१९ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असल्याने या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा पोलिस दलाकडून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एसपी सुनील कडासने यांच्या देखरेखीखाली २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १४२ पोलीस कर्मचारी, १० महिला पोलिस कर्मचारी यांच्यासह बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
प्राप्त माहितीनुसार सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत आज,१९ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता संतनगरी शेगावात दाखल होतील. श्री.संत गजानन महाराजांचे दर्शन आणि काही निवडक भेटीनंतर ते वाशिम कडे रवाना होणार आहेत. आज वाशिम येथे त्यांचा मुक्काम असून उद्या ते श्री.क्षेत्र माहूरगडला दर्शनासाठी जाणार आहेत. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदिराचा राष्ट्रार्पण सोहळा जानेवारी महिन्यात आहे, या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत देशभरातील तीर्थक्षेत्रांचा , देवस्थानांच्या प्रवास करीत आहेत. या प्रवास योजनेअंतर्गत त्यांचा आज शेगाव प्रवास असल्याचे सूत्रांनी सांगितले.