मोठी बातमी! रविकांत तुपकरांनी बोलावली तातडीची बैठक;मोठी घोषणा करण्याची शक्यता...
Oct 23, 2023, 08:53 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आजारपणातून सावरल्यानंतर रविकांत तुपकर पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर च्या कार्यालयातून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. दरम्यान,आज २३ ऑक्टोबरला रविकांत तुपकर यांनी तातडीची बैठक बोलावली आहे, या बैठकीत रविकांत तुपकर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
शेतकरी ,शेतमजूर, तरुण व कार्यकर्त्यांची ही जम्बो बैठक बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीनंतर रविकांत तुपकर पत्रकार परिषद घेणार आहेत. या वर्षी उत्पादन खर्चात वाढ झाली असली तरी सोयाबीन,कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. सोयाबीन वरील येलो मोझॅक, कापसावरील गुलाबी बोंड अळी, अपुरा पाऊस यामुळे शेतकरी संकटात आहे. या मुद्द्यावर बोट ठेवून रविकांत तुपकर व्यापक जन आंदोलनाची तयारी करीत आहेत. आंदोलन नेमके कसे असेल? आंदोलनाची दिशा काय असेल यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत मिळण्याची शक्यता आहे.