मोठी बातमी! लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३ शेतकरी वाहून गेले; झाडाच्या मुळांना धरून दोघे वाचले पण एक सापडेना! एका बैलाचाही मृत्यू

 
jfjf

लोणार(प्रेम सिंगी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील काही गावांत ४ जुलैच्या दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात तिघे वाहून गेले, त्यापैकी दोघे वाचले असून एक बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे. शिवाय एका बैलाचा देखील वाहून मृत्यू झाला आहे. लोणार तालुक्यातील शिवणी जाट गावात ही घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव समाधान श्रीराम सरकटे (४२) असे आहे.मजुरीकामासाठी गेलेले समाधान सरकटे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसोबत  बैलगाडीने शेतातून घराकडे येत होते.  त्यावेळी नाल्यावरील पुलावर बैलाचा पाय घसरल्याने बैलगाडी उलटून ओढ्यात पडली. ओढ्यात पुराच्या पाण्याचा प्रवाह होता. पुराच्या पाण्यात बैलगाडीसह तिघे वाहून गेले. सुदैवाने झाडाच्या मुळांना पकडल्याने सरकटे यांचे सहकारी वाचले. मात्र गावकऱ्यांनी शोध घेऊनही सरकटे अद्याप सापडले नाहीत. बैलगाडीचा एक बैल वाचला असून एक बैल घटनास्थळापासून मृतावस्थेत सापडला आहे.समाधान सरकटे नाल्याने वाहून ते  धरणापर्यंत गेले असावेत असा अंदाज आहे. दरम्यान रात्री अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच लोणार तहसीलदार गिरीश जोशी, शिवसेना नेते नंदू मापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.