BIG BREAKING लोणारमध्ये अवैध गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक पकडला; गुरांना कोंबून नेत होते! हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक...

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार मध्ये अवैध आणि निर्दयतेने गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पकडला आहे. आज,२४ मे रोजी सायंकाळी मंठा चौफुलीवर हा ट्रक पकडण्यात आला आहे. सध्या हा ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून त्यात २५ पेक्षा अधिक गोवांशीय गुरे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ लोणार पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांकडून प्रकरणी गुप्तता पाळण्यात येत असल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते, कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या गेटवरच अडवले होते. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गोवंशीय गुरांना गोशाळेत पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.