BIG BREAKING भरोसा गावात अघटीत घडलं! विवाहीतेने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीव दिला, काढायला गेलेला तरुणही बुडाला; चौथ्यानेही मारली उडी! तिघांचा मृत्यू; एकाच सरणावर पेटले मायलेकांचे देह...

 
Ncjcj
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील भरोसा गावातून एक अघटीत बातमी समोर आली आहे. २६ वर्षीय विवाहितेने २१ महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन विहिरीत उडी घेऊ जीव दिला. या घटनेनंतर त्यांना काढायला एका तरुणाने विहिरीत उडी घेतली, त्या तरुणाचा देखील मृत्यू झाला. तरुणाला वाचवण्यासाठी आणखी एकाने विहिरीत उडी मारली, सुदैवाने विहीरीच्या काठावरील लोकांनी विहिरीत टाकलेली दोरी हाती लागल्याने त्यांचा जीव वाचला. ६ नोव्हेंबरच्या रात्री १० च्या सुमारास हा थरार घडला...
शितल गणेश थुट्टे (२६) देवांश गणेश थुट्टे (२१, महिने) आणि सिद्धार्थ निंबाजी शिरसाट(३६) तिघेही रा.भरोसा, ता चिखली अशी मृतकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार काल सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शितल ने चिमुकला देवांश यांच्यासह गावातील दिनकर सदाशिव जाधव यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत जाऊन आत्महत्या केली. शोधाशोध केल्यानंतर घटना उघडकीस आली. रात्री १० च्या सुमारास गावातील सिद्धार्थ निंबाजी शिरसाट या तरुणाने मायलेकांना बाहेर काढण्यासाठी विहिरीत उडी मारली, मात्र रात्रीचा अंधार, विहिरीतील गाळ यामुळे त्याचाही मृत्यू झाला. सिद्धार्थ पाण्याबाहेर न आल्याने त्याला वाचवायला सुगदेव त्र्यंबक थुट्टे (५५) यांनी विहिरीत उडी मारली, तेही अस्वस्थ झाले होते मात्र विहिरीच्या काठावर असलेल्या लोकांनी विहिरीत टाकलेली दोर हाती लागल्याने त्यांचा जीव वाचला.
 घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी आज पहाटे स्थानिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणीसाठी ते चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. एकाच घटनेत तिघांचा जीव गेल्याने भरोसा गावात हळहळ व्यक्त होत आहे..
कारण उलगडेना..
शितल आणि गणेश यांचे ३ वर्षांपूर्वी लग्न झाले. गणेश थुट्टे हे शेती आणी शेतमजुरी करतात. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. काल,घटनेच्या दिवशी गणेश हे कामाला गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास चिमुकला देवांश घरासमोर कुत्र्याशी खेळत होता, त्याचा व्हिडिओ काढून शीतल ने गणेश यांना पाठवला. मात्र नंतरच्या एका तासात काय झाले कुणास ठाऊक. शितल यांची सासू देखील घटनेच्या दिवशी घरी नव्हती, त्या सेवाधारी म्हणून धार्मिक स्थळी गेल्या आहेत..