बिग ब्रेकिंग! पालिकांची निवडणूक वेळेवर होणे अशक्य! शासनाने नेमले प्रशासक : जिल्ह्यातील ९ परिषदांचा समावेश

 
file photo
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यासह जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणार या पालिका व राजकीय वर्तुळातील चर्चेवर आज, २८ डिसेंबरला शिक्कामोर्तब झालं! राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने आज मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांवर प्रशासक नेमले आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याच्या पालिका व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यासह बुलडाणा जिल्ह्यातील बहुतेक नगरपरिषदांची मुदत १ ते ३ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. बुलडाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास, ९ पालिकांची मुदत ३ जानेवारीला संपणार आहे. या निवडणुका घेणे अशक्य असल्याने निवडणूक आयोगाने या पालिकेवर प्रशासक नेमण्याचे निर्देश दिले आहेत. याचे पालन करत राज्याच्या नगर विकास खात्याने मुदत संपण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पालिकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक यांना बजावले.

कोविडचा प्रादुर्भाव, ओमिक्रोनची धास्ती आणि निवडणुकीची अपुरी पूर्वतयारी या बाबी लक्षात घेता प्रधान सचिव महेश पाठक यांनी एसडीओ, तहसीलदार व पालिका मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेश काढून संबंधित अधिकाऱ्यांना पदाचा प्रभार स्वीकारण्याचे सूचित करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दृष्टीक्षेपात प्रशासक...
जिल्ह्यातील ३ जानेवारी रोजी मुदत संपणाऱ्या पालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहे. बुलडाणा, चिखली, खामगाव, नांदुरा, शेगाव पालिका प्रशासकपदी संबंधित पालिका मुख्याधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मलकापूर, जळगाव व देऊळगाव राजा पालिका प्रशासक पदाची सूत्रे संबंधित उपविभागीय अधिकारी तर मेहकरमध्ये तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.