चिखलीत शनिवारी घोंगावणार 'भीम आर्मी'चे वादळ! सामाजिक परिवर्तन महारॅलीचे आयोजन...

 
Bhim
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सामाजिक परिवर्तन घडविण्याकरिता प्रस्थापितांचा गड समजल्या जाणाऱ्या चिखली शहरात ३१ ऑगस्ट रोजी भीम आर्मीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात सामाजिक परिवर्तन महारॅली काढण्यात येत आहे.भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यापासून सतीश पवार यांनी जिल्हाभरात युवकांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. गावोगावी संघटन मजबूत केले जात आहे. समाजाला सत्तेचा भाग बनविण्यासाठी गावागावात जावून आखणी केली जात आहे. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत सामाजिक परिवर्तनाची बीजे रुजवली जात आहेत.
ठिकठिकाणी शाखा स्थापन करून भीम आर्मीच्या नामफलकांचे अनावरण मोठ्या जल्लोषात सुरू आहे. युवावर्गाकडून सतीश पवार यांच्यासह सहकाऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. चिखली तालुक्यातदेखील भीम आर्मीची ताकद वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सामाजिक परिवर्तनाची पाळेमुळे घट्ट रोवण्याकरिता चिखली शहरात ३१ ऑगस्ट रोजी सामाजिक परिवर्तन महारॅलीचे आयोजन भीम आर्मीच्या वतीने करण्यात आले आहे. या महारॅलीत समाजाबांधवांसह बहुजनवादी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सतीश पवार यांनी केले आहे.
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
रॅलीच्या समारोपानंतर चिखली येथे तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भीम आर्मीच्या तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.