जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाईजी आले धावून! जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे भाग्य उजळले! "बुलडाणा अर्बन"च्या पुढाकारातून कारखाना लवकरच होणार सुरू

 
Bhaiji
बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  जिल्ह्यातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून दुसरबीडच्या जिजामाता सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. गत दहा वर्षांपासून कारखाना बंद होता. मात्र, बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या प्रयत्नांनी या कारखान्याचे नशीब पालटले आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी कारखान्याची खरेदी झाली असून येत्या काही दिवसांत कारखाना पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.जिजामाता सहकारी साखर कारखान्यामुळे दुसरबीड परिसरात हरीतक्रांती झाली होती. परंतु काही कारणास्तव हा कारखाना दहा वर्षांपासून बंद पडला होता. त्यासाठी शासनस्तरावरूनही प्रयत्न झाले होते. परंतु यश आले नव्हते. अखेर बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी गेल्या तीन वर्षांपासून कारखाना पुन्हा सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न केले. त्याला आता यश आले आहे. व्यंकटेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडला सदर कारखाना विकत घेण्यासाठी बुलडाणा अर्बनने पुढाकार घेऊन ३० कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. 
सदर कर्ज कारखान्याचे जिजामाता सहकारी साखर कारखाना हे नाव न बदलण्याच्या अटीवर उपलब्ध करून देण्यात आले. कारखान्याची खरेदी झाल्याने लवकरच तो सुरू केला जाणार आहे. 
बुलढाणा अर्बनच्या पुढाकाराने तीन कारखाने सुरू
यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखाने बुलडाणा अर्बनच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले. त्यातील एक म्हणजे धाड (वरुड ) येथील अनुराधा सहकारी साखर कारखाना व मेहकर येथील महेश शुगर हे दोन कारखाने बंद स्थितीत होते. बुलडाणा अर्बननेच पुढाकार घेऊन सदर कारखाने सुरू केले असून ते चांगल्याप्रकारे चालू आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आता तीन सहकारी साखर कारखाने असून शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी. त्यामुळे जिल्ह्यात हरितक्रांती घडून येईल व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, असा विश्वास राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केला.(साभार - दैनिक पुण्यनगरी)