सागवनच्या तलाठ्यांना मारहाण! नैसर्गिक आपत्तीचे पैसे खात्यात जमा झाले नाही म्हणून कार्यालयात घुसून धक्काबुक्की; जीवे मारण्याचीही दिली धमकी...

 
Bxbxb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील सागवन आणि कोलवडचे तलाठी म्हणून कार्यरत असलेले नितीन उत्तमराव अहिर यांना मारहाण झाली आहे. त्यांच्या कार्यालयातच घुसून सागवनच्या विशाल अशोक सोनुने (३२) याने हे कृत्य केल्याचे बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात आजरोजी दाखल तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीवरून पोलिसांनी विशाल अशोक सोनुने विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार घटना १० ऑक्टोबरची आहे, मात्र तहसीलदार बैठकांत व्यस्त असल्याने त्यांच्याशी चर्चा करून उशिरा तक्रार देण्यात आली. तलाठी अहिर यांनी शासकीय कामासाठी कार्यालय म्हणून बुलडाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा गाळा क्रमांक १९ भाड्याने घेतलेला आहे. घटनेच्या दिवशी ते त्यांच्या कार्यालयात शासकीय कामकाज करीत होते. त्यावेळी दुपारी अडीचच्या सुमारास सागवन येथील विशाल सोनुने हा कार्यालयात घुसला.
   
 "नैसर्गिक आपत्तीचे पैसे माझ्या खात्यात जमा झाले नाही" असे म्हणत त्याने तलाठी आणि मदतनिसासोबत वाद घातला. त्यावेळी नैसर्गिक आपत्तीचे यादी आम्ही वरिष्ठांना पाठवली असे तलाठी अहिर यांनी विशाल सोनुने याला सांगितले. मात्र विशाल ने ऐकून न घेता शिविगाळ करून तलाठी अहिर यांना धक्काबुक्की करीत लोटून दिले. यामुळे अहिर यांच्या पाठीला मार लागल्याने तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय विशाल सोनुने याने तलाठी अहिर यांच्या टेबलवरील लॅपटॉप फेकून दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे . "तू इथे कसा काम करतो ,तुला बघुन घेतो" असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तलाठी अहिर यांनी तक्रारीत म्हटले आहे.