आपला बुलडाणा "या' कामात तर लई मागं आहे बाप्पा!
लसीकरणात राज्यात २९ वा क्रमांक!!
Nov 10, 2021, 12:57 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. मिशन कवचकुंडल अभियान राबवूनही बुलडाणा जिल्ह्यात मात्र लसीकरणाची गती संथच आहेत. देशातील ज्या ३४ जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची गती संथ आहेत त्यात बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ५४ टक्केच असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोनाची महाभयंकर अशी दुसरी लाट ओसरल्याने सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. उपचार घेणाऱ्या व नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट दिले असताना जिल्ह्यात मात्र लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याला २१,०४,९०० इतके लसीकरणाचे उद्दिष्ट मिळाले आहे. आतापर्यंत ११,६४,६३३ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५,३१,०८८ इतकी आहे. ५४ टक्के लोकांनीच पहिला डोस घेतल्याने उर्वरित लोकांचे लसीकरण झटपट करून घेण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्याकडे सध्या कोव्हिशिल्डच्या २,३६,५६० तर कोवॅक्सिनच्या १,१६,१०० अशा एकूण ३लाख ५२,६६० लसींचा साठा शिल्लक आहे.