मेहकरात बालाजी भक्तांचे उपोषणास्त्र! मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर होत असलेली मांस विक्री बंद करण्याची मागणी;

मेहकरात बालाजी भक्तांचे उपोषणास्त्र! मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर होत असलेली मांस विक्री बंद करण्याची मागणी; नगरपरिषद प्रशासन दखल घेईना;उपोषणकर्ते संतोष मालोसे म्हणाले, जीव गेला तरी मागे हटणार नाही...

 

मेहकर(अनिल मंजुळकर-बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर नगरीचे आराध्य दैवत श्री शारंगधर बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर होत असलेली मांस विक्री बंद करावी,श्री क्षेत्र ओलांडेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमण हटवण्यात यावे  या मागण्यांसाठी मेहकरातील बालाजी भक्तांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. बालाजी मंदिराचे विश्र्वत, सामाजिक कार्यकर्ते तसेच भक्तगण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. याआधी तशा आशयाचे निवेदन देऊन देखील मेहकर नगरपरिषदेने निवेदनाची दखल घेतली नाही, परिणामी हे आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत पोहचले आहे. आज,२ ऑक्टोबरला गांधीजयंतीच्या मुहूर्तावर या आमरण  उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली असून नगरपरिषद कार्यालयाच्या समोरच आंदोलनकर्ते उपोषणाला बसले आहेत.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर मांस विक्री होत आहे, यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत, मात्र असे असले तरी नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहेत. तहसील चौक ते बालाजी संस्थान या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे, बालाजी संस्थान ते ओलांडेश्वर मंदिर या रस्त्यावरील अतिक्रमीत ऑटोरिक्षा स्टँड, रस्त्यावर उभे राहत असलेली वाहने यावर कायमस्वरूपी कारवाई अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. महात्मा फुले भाजी मार्केटच्या ५ पैकी ४ गेटवरील अतिक्रमण काढून नागरिकांसाठी मार्केटचा रस्ता करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याच मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आमरण उपोषणला सुरुवात झाली आहे.


टाळ मृदंगाच्या गजरात सुरू झालेल्या या आमरण उपोषणाला श्री शारंगधर बालाजी मंदिराच्या अध्यक्षांनी देखील एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून पाठिंबा दर्शविला आहे. बालाजी मंदिराचे विश्वस्त बबलू मुंदडा, ह.भ. प भागवत महाराज भिसे, सामाजिक कार्यकर्ते संतोष मालो मागण्या मान्य करून देण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. याशिवाय शहरातील प्रतिष्ठितांसह सामान्य नागरिक देखील लाक्षणिक उपोषणात सहभागी होत आहेत. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संतोष मालोसे यांनी त्यांची प्रतिक्रिया बुलडाणा लाइव्ह कडे दिली आहे. भगवान बालाजीच्या भक्तांच्या निवेदनाची दखल घेऊन कारवाई करायला नगरपरिषदेकडे वेळ नाही.  उघड्यावर मांस विक्री करू देण्याच्या  बदल्यात काही "खाबुगिरी" तर होत नाही ना याचा तपास होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.आता आम्ही मागण्या मान्य करून घेण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषणाचे हत्यार उपसले आहे, आता आमचा  जीव गेला तरी चालेल मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही असे संतोष मालोसे म्हणाले.