अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले! नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्राम संघटनेची मागणी
देऊळगाव राजा( राजेश कोल्हे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून वादळी वान्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे कांदा, गहू, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यासह अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात जरी सर्वसामान्यांना पावसाचा काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा, टरबूज, संत्रा, गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कांदा पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी फळपिकांचेदेखील नुकसान झालेले आहे.
अवकाळी पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. कांदा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसंग्रामचे राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत खान, शंकर वाघमारे, संतोष हिवाळे आदींनी केली आहे.