वेळेत विजबिले भरून दंड टाळा! महावितरणचे आवाहन! ऑनलाईन बिल भरल्यास मिळते सवलत; वाचा कसे भरायचे ऑनलाईन बिल...

 
mahavitaran

बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):राज्यामध्ये चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी १२ लाख घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिल तर भरले, पण बिल भरण्याची मुदत न पाळल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला. वीज ग्राहकांनी वेळेत बिल भरून दंड टाळावा, तसेच वेळेपूर्वी आणि ऑनलाईन बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ नंतर महावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत की, ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरली पण बिल भरण्याच्या देय दिनांकानंतर बिल भरल्याने त्यांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला. यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. व्यावसायिक ग्राहकांची संख्या १ लाख ३३ हजार आहे तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १७ हजार आहे. महावितरणच्या वीज बिलावर मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो. बिल अथवा देयक दिनांकापासून २१ दिवसात बिल भरायचे असते. त्याची स्पष्ट मुदत देय दिनांक नावाने दिलेली असते. त्यानंतर बिल भरले तर सव्वा टक्का दंड द्यावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी देय दिनांक (ड्यू डेट) पर्यंतच बिल भरावे.

महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनची सुविधा वापरली तर त्यांना वीजबिलात मोठी सवलत मिळते. वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम अॅप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या अॅपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो- ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. सध्या महावितरणचे साठ टक्के ग्राहक ऑनलाईन बिल भरतात. विजेची बिले ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीज ग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलात सवलत मिळते.