आशा, गट प्रवर्तकांचे जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आशा स्वयंसेविकांचे थकीत मानधन देण्यात यावे. असभ्य वर्तन करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नेहा अग्रवाल यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे. चिखली येथील आरोग्य केंद्रातील आशा वर्कर यांचा थकीत मोबदला व मानधनात वाढ करण्यात यावी. ऑक्टोबर २०२१ पासून संघटनेच्या पाठपुराव्यामुळे सुरू झालेल्या आशा व गटप्रवर्तकांना प्रत्येकी १ हजार व ५०० रुपये कोरोना भत्ता देण्यात यावा या मागणीसाठी आज, १० जानेवारीपासून आशा व गट प्रवर्तक संघटनेतर्फे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुद्धा आज देण्यात आले.

जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जि. प. मुख्यधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत संघटनेच्या वतीने १ डिसेंबर रोजी चर्चा करण्यात आली. एक महिना उलटून देखील जिल्हा परिषद प्रशासनाने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने आजपासून आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. आशा स्वयंसेविकांबाबत असभ्य वर्तन करणाऱ्या  वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा अग्रवाल यांना तात्काळ निलंबत करण्यात यावे.

सौ. मीरा दांडगे वाघूळ ता.मलकापूर येथील अत्याचारग्रस्त आशा वर्करला त्वरीत आर्थिक सहाय्य करून न्याय देण्यात यावा. उमाळी आरोग्य केंद्रात  काम करणाऱ्या सौ. रेखा भगत यांचा लसीकरणादरम्यान अचानक मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी. पोलिओ आणि इतर सर्वेचा मोबदला तसेच आशा व गट प्रवर्तकांच्या गणवेशाबाबतचा निर्णय तात्काळ घेण्याची मागणीसुद्धा निवेदनात करण्यात आली आहे. आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय्य मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आशा व गट प्रर्वतकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, विजया ठाकरे, कविता चव्हाण, रेखा इंगळे, छाया जाधव, सुरेश्खा गायकवाड, चंदा झोपे, रमा निंबाळकर, मनिषा इंगळे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.