लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४५७ परवानाधारक शस्त्रे जमा ; मतदानाच्या दिवशी अतिरिक्त १४०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार!
Mar 27, 2024, 17:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. देशभरात आचारसंहिता लागु असताना परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ६६५ शस्त्र परवाने आहेत. त्यापैकी ४५७ शस्त्रे पोलीस विभागाकडून जमा करण्यात आले आहेत. २६ एप्रिल रोजी बुलढाणा मतदार संघाचे मतदान होणार असून या दिवशी पोलीस दलाच्या १४०० कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त बंदोबस्त राहणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. आज २७ मार्च रोजी , जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस विभागाकडून महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सुरक्षिततेसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी झाली आहे. त्यामध्ये एसआरपीएफ जवानांच्या समावेश असणार आहे. सीमा भागाच्या ठिकाणी २ आंतरराष्ट्रीय चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. एकंदरीत संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.