अरविंद चावरिया हेच जिल्हा पोलीस दलाचे बॉस! सोशल मीडियावर व्हायरल होणारी यादी फेक

 
सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती; जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया समितीचे अध्यक्ष
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील ६२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बदली नाशिक शहर येथे पोलीस उपायुक्त म्हणून झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यांच्या जागी श्रीकांत परोपकारी हे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक असा उल्लेख यादीत आहे. मात्र ही यादी फेक असून, तशी कोणतीही लेखी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाली नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.


काल, ११ जानेवारी रोजी विविध समाजमाध्यमांत राज्यातील ६२ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची बातमी व्हायरल होत होती. व्हायरल होणाऱ्या यादीत कुठे कुणाची बदली झाली हेसुद्धा दर्शविण्यात आले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येत अधिकाऱ्यांची बदली झाल्याची चर्चा होती. मात्र हा यादी फेक असल्याचे समोर आले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीसुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, सायबर पोलिसांना हा खोडसाळपणा करणाऱ्याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील वाचकांना विनंती आहे, की जोपर्यंत बुलडाणा लाइव्ह एखादी बातमी प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही व्हायरल मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणारी प्रत्‍येक बातमी ही सत्‍य, खातरजमा, पुरेसे पुरावे जमा करूनच प्रसिद्ध होत असते. त्‍यामुळे अशा व्हायरल फेक मेसेजवर विश्वास ठेवण्याऐवजी बुलडाणा लाइव्हवर बातमी प्रसिद्ध होण्याची वाट पाहणे कधीही चांगले.