अरेच्चा !देऊळगाव कुंडपाळ ग्रामपंचायतला लावले कुलूप; वाचा कारण काय?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव कुंडपाळ गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
देऊळगाव कुंडपाळ येथील ग्रामपंचायतच्या ताब्यातील ११० एकर गायरान जमीनीवर पारधी समाजाच्या नागरीकांनी अनधिकृत रित्या अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांसह ग्रामपंचायत प्रशासनानेही पोलिस प्रशासन महसूल प्रशासन व शासनाला अनेक वेळा निवेदन दिले. उपोषण केले, परंतु ग्रामस्थांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. २ जुलै रोजी तहसीलदार तसेच आमदार यांनी देखील निवेदन देण्यात आले होते.
पंधरा दिवसात अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी आश्वासन ही प्रशासनाने दिले होते. परंतु, दीड महिन्याचा कालावधी घेऊनही स्थानिक प्रशासन तसेच महसूल व पोलिस प्रशासनाने अतिक्रमण निष्काशित केले नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी तत्काळ गायरानवरिल अतिक्रमण हटवा मागणी केली आहे. अन्यथा २० ऑगस्टला ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानुषंगाने २० ऑगस्ट रोजी विजय प्रकाश सरकटे यांच्या नेतृत्वात महादेव डोंगरे, अमोल राठोड आणि परमेश्वर राठोड यांनी हे कुलूप ठोकले.