साखरखेर्ड्यात आणखी एक खून! दगडाने ठेचले; आठवड्यातील दुसरी घटना

 
h

सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साखरखेर्डा येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रक्ताने माखलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दगडाने ठेचून संबंधित व्यक्तीचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी पिंपळगाव सोनारा येथीलच एकाला  चौकशीसाठी  ताब्यात घेतले.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव  गणेश शिंगणे असून, तो सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील रहिवासी आहे. साखरखेर्डा बसस्थानक परिसरात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील एका इमारतीसमोर रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडलेला असल्याचे काही मुलांच्या सायंकाळी निदर्शनास आले. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहाणी केली. या व्यक्तीच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला असल्याचे दिसत असल्याचे असे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळाजवळ रक्ताने माखलेला एक दगडही दिसून आला. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान पोलिसांनी पिंपळगाव सोनारा येथील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खुनाचे कारण चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान साखरखेर्डा येथे आठवडाभरातच खुनाची दुसरी घटना घडली आहे. याआधी शुल्लक वादातून  १७ वर्षीय तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.