संतापजनक ! मेहकर तालुक्यातील बेलगावात निघाला मुन्नाभाई! ना कुठली डिग्री ना सर्टिफिकेट...तरी बिनधास्त टोचत होता! आता होणार वांधे..
Jan 4, 2024, 15:32 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: अनिल मंजुळकर)डॉक्टरला देवाच्या ठायी मानले जाते. समाजात डॉक्टरांना सन्मानजनक वागणूक मिळते त्यांचा आदर केला जातो. मात्र असं असलं तरी स्वतःला डॉक्टर सांगून रुग्णांच्या जीवांशी खेळण्याच महापाप मेहकर तालुक्यातील बेलगावात एका
बोगस डॉक्टरने केले आहे.मेहकर तालुक्यातील बेलगाव भागात तोतया डॉक्टर परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे. दरम्यान काल ३ जानेवारीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तोतया डॉक्टर श्रीकृष्ण बनसोड याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलगाव भागात श्रीकृष्ण बनसोड स्वतःला डॉक्टर सांगून ग्रामस्थांवर उपचार करायचा. दरम्यान वैद्यकीय पथकाला मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय अधिकारी पथकासह व पोलिसांच्या साहाय्याने घटनास्थळी पोहोचले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र आढळले नाही इतकच नाही तर त्याच्याकडे असलेले औषधी, इंजेक्शन देखील अधिकृत पद्धतीने बाळगल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तोतया डॉक्टर श्रीकृष्ण बनसोडच्या दवाखान्याला सील केले. पोलिसांच्या साहाय्याने त्या तोतया डॉक्टरला ताब्यात घेऊन डोणगाव पोलीस स्टेशनला हजर केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम गायकवाड यांच्या तक्रारीनुसार आरोपी श्रीकृष्ण बनसोड याच्यावर भादवीचे कलम ४१९,४२०, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे कोणतीही डिग्री नसतांना या बोगस मुन्नाभाईने दवाखाना थाटला होता. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे करत आहेत.