पालवे दाम्‍पत्‍याला "आम्‍ही सारे कार्यकर्ता' पुरस्कार जाहीर

 
file photo

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोनशेच्या वर मनोरुग्‍णांचा सांभाळ करणारे पळसखेड सपकाळ (ता. चिखली) येथे सेवा संकल्प प्रतिष्ठानचे डॉ. नंदकुमार पालवे व सौ. आरती नंदकुमार पालवे यांना अमरावतीच्या जाणीव फाऊंडेशनतर्फे आम्‍ही सारे कार्यकर्ता हा पुरस्‍कार जाहीर झाला आहे. २८ नोव्‍हेंबरला अमरावतीत पुरस्‍काराचे वितरण ज्‍येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हस्ते हाेणार आहे. रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

शेतकरी आंदोलक व लेखक चंद्रकांत वानखडे यांच्या सामाजिक कृतज्ञता निधीतून दरवर्षी सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षी कोरोनामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला नव्हता. यावर्षीचा पुरस्कार पालवे दाम्‍पत्‍याला जाहीर झाला आहे. वरिष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जाणीव प्रतिष्ठानचे प्रदीप पाटील, नितीन चौधरी, आशिष कडू, डॉ. हरिश बिंड, डॉ. मुकेश टापरे, सुधीर दरणे, डॉ. पराग सावरकर, राहुल तायडे, आकाश देशमुख, राहुल तायडे, रवींद्र मोरे, अली असगर कोवैतवाला, विद्या लाहे, सोनाली देवबाले यांनी दिली आहे.