हरिपाठात तल्लीन अनिकेतच्या मुखी होता हरिनामाचा गजर! २७ अभंग तोंडपाठ होते;दुर्दैवी मृत्यूने समाजमन झाले सुन्न! करवंडच्या तलावात जलसमाधी

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ति चारी साधियेल्या। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी। असोनि संसारी जिव्हे वेगु करी। वेदशास्त्र उभारी बाह्या सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा। द्वारकेचा राणा पांडवा घरी।
या हरिपाठाच्या ओळी उच्चारत मोठा होत असलेला अनिकेत रोज शाळा सुटल्यानंतर आपले सवंगडी जमा करून गावातील एका देवीच्या मंदिरात नित्य हरिपाठ घेत होता.
२८ फेब्रुवारीलादेखील तो हरिपाठ घेण्यासाठी येणार म्हणून त्याची मित्र मंडळी मंदिरात जमादेखील झाले होते. मात्र, तो ठरलेल्या वेळेत आला नाही. काही काळ वाट पाहिल्यावर त्याठिकाणी त्याचे नाव पुकारण्यात आले; परंतु काहीच प्रतिसाद आला नाही. तितक्यातच गावातील एका नागरिकाने त्याचे कपडे तलावाकाठी पाहिल्याचे समजले. नंतर शोधाशोध झाली. काही वेळानंतर अनिकेत व त्याचा मित्र आदित्य नारायण जाधव या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना समोर आली.
आताच्या मोबाइलच्या युगात लहान मुलेदेखील मैदानी खेळ विसरून मनोरंजनाकडे वळल्याचे दिसत आहे. ऑनलाइन शिक्षणानंतर या मुलांना मोबाइलचे जणू व्यसनच लागले. करवंड येथे मात्र आध्यात्मिक वातावरण असल्याने अनिकेतच्या बालमनावर त्याचा परिणाम झाला आणि त्याने हरिपाठाच्या ओळी तोंडपाठ केल्या. आध्यात्मावर आपली पकड असल्याचे सिद्ध केले. खेळण्याबागडण्याच्या वयातच हा निरागस चिमुकला सर्वांना सोडून गेला. २७ अभंग त्याचे तोंडपाठ होते. साभार: दैनिक पुण्यनगरी,बुलडाणा