Amazon Ad

विविध मागण्यांसंदर्भात बुलढाण्यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गटप्रवर्तकांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकार्यालयावर!

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सिटू संघटनेचा मोर्चा आज १० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. न्याय हक्काच्या मागण्यांसंदर्भातील घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. 

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गटप्रवर्तक महिला यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे व मानधनात वाढ झाली पाहिजे, यासह अन्य विविध मागण्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला. CITU संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शहरातील कारंजा चौकातून निघत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा धडकला. राज्य सरकारने, प्रलंबित मागण्या संदर्भात विचार केला पाहिजे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी अपेक्षा आंदोलक महिलांनी व्यक्त केली.